टाळेबंदीमुळे कुशल तंत्रज्ञ, यंत्रसामग्री चंदिगडमध्येच अडकली

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोनाच्या संकटामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा फटका हँकॉक पुलालाही बसला आहे. सुट्टे भाग एकत्र करून हँकॉक पुलाचा सांगाडा तयार करण्यात आला आहे. मात्र नियोजित ठिकाणी तो बसविण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि कुशल तंत्रज्ञ टाळेबंदीमुळे चंदिगड येथून मुंबईत पोहोचू शकलेले नाही. पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल, असा पालिके चा दावा आहे.

ब्रिटिशांनी १८७९ मध्ये सॅण्डहर्स्ट रोड आणि भायखळा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गावर हँकॉक पूल उभारला. पुलाची १९२३ साली डागडुजी करण्यात आली. आता हा पूल धोकादायक बनल्यामुळे पालिकेने २०१६ मध्ये पाडला. तत्पूर्वी पुलावरील अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली होती. माझगाव आणि भायखळ्यामधील नागरिकांसाठी हा पूल महत्त्वपूर्ण आहे. पूल पाडल्याने या भागातील नागरिकांना द्राविडी प्राणायाम घडत आहे.

पुलाचे गर्डर विभक्त करून मुंबईत आणण्यात आले. पुलाच्या ठिकाणी सुटे भाग जुळवून पुलाचा सांगाडा तयार आहे. परंतु तो बसविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या यंत्रसामग्रीची आणि विशेष कुशल तंत्रज्ञांची आवश्यकता आहे. ही यंत्रसामग्री व तंत्रज्ञ टाळेबंदीमुळे चंदिगड येथून मुंबईत येऊ शकले नाहीत. त्यामुळे हा पूल पावसाळ्यापूर्वी कार्यान्वित होईल की नाही हा प्रश्न आहे. देशात ३ मेपर्यंत टाळेबंदी लागू आहे. मात्र पुलाच्या सांगाडय़ाचे अखेरच्या टप्प्यातील काम सुरू असल्याचे पालिकेने सांगितले.

अडथळ्यांची मालिका

पुलाच्या बांधकामात अनेक अडथळे आले. पालिकेने नियुक्त केलेले कंत्राटदार रस्ते घोटाळ्यात अडकले. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पालिकेला त्यांची कंत्राटे रद्द करावी लागली. फेरनिविदा काढून कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर देशात वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला. त्यामुळे पुन्हा फेरनिविदा काढून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. पुलासाठी ६६० मेट्रिक टन वजनाचे गर्डर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आयआयटी पवई यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अस्तित्वात पुलाच्या गर्डरचे आराखडे बदलण्याची सूचना रेल्वे प्राधिकरणाकडून करण्यात आली. त्यानुसार १३७४ मेट्रिक टन वजनाचे गर्डरची निर्मिती करण्यात आली. त्याचबरोबर अन्य कामांमध्येही काही फेरफार करण्यात आले.

खर्चही वाढला

कामात बदल करण्यात आल्याने खर्च २० कोटी ८५ लाखांनी वाढला. तांत्रिक सल्लागाराला ६१ लाख ६८ हजार रुपये शुल्क देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. वाढीव कामामुळे त्याचेही शुल्क २८ लाख २४ हजारांनी वाढले. आता ते ८९ लाख ९२ हजारांवर पोहोचले आहे. परिणामी पुलाच्या उभारणीवरील खर्च ६३ कोटी ६ लाख २० हजार रुपयांवर पोहोचला आहे.