News Flash

हँकॉक पूल नोव्हेंबरपासून खुला?

सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल १८७९ साली बांधण्यात आला होता.

पूल धोकादायक झाल्याने २०१६ मध्ये पाडण्यात आला.

दुसरा गर्डर बसवण्याचे काम पूर्ण

मुंबई : पाच वर्षांपासून रखडलेल्या हँकॉक पुलाचे रेल्वे रुळांवरील काम पूर्ण झाले आहे. रेल्वे रुळावर येणाऱ्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम पालिकेकडून रविवारी करण्यात आले. त्यासाठी मध्य रेल्वेवर सुमारे पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. यानंतर अन्य कामे पूर्ण करून नोव्हेंबर २०२१ पासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असणार आहे.

सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक पूल १८७९ साली बांधण्यात आला होता. हा पूल धोकादायक झाल्याने २०१६ मध्ये पाडण्यात आला. त्यानंतर पालिकेकडून पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. पुलाअभावी या परिसरातील नागरिकांना रेल्वे मार्गिकेच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत होता. त्यामुळे पूल लवकर बांधला जावा, अशी मागणी स्थानिकांनी केली होती. पालिका प्रशासनाने पहिल्यांदा निविदा काढून जे कंत्राटदार नेमले होते ते रस्ते घोटाळ्यातील दोषी निघाले. त्यामुळे या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने हे कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली होती. फेब्रुवारी २०१८ मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. पण या कामामध्ये जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या,  रेल्वेच्या जागेतील अतिक्रमण आदी अडथळे आल्यामुळे कामाला वेग येत नव्हता. विविध अडचणींमुळे या पुलाचे काम रखडले होते. परिणामी, गेल्या पाच वर्षांंपासून पूल बंद

आहे.

दरम्यान, पुलावर एक गर्डर बसविण्याचे काम गेल्यावर्षी जुलै महिन्यात करण्यात आले. दुसरा गर्डर बसविण्याचे काम रविवारी पूर्ण करण्यात आले.

रस्त्याचा प्रश्न प्रलंबित

हँकॉक पुलाच्या दोन्ही बाजूला ९० फूट रुंदीचा रस्ता बांधला जाणार आहे. पूर्वीचा रस्ता त्यापेक्षा कमी रुंद होता. या प्रस्तावित रस्त्यासाठी जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे. रस्त्यामधील निवासी संकुले आणि दुकाने तोडावी लागणार आहेत, मात्र स्थानिकांचा त्याला विरोध आहे. सध्या पालिकेच्या ताब्यात काही जमीन आली आहे, मात्र आणखीही जमीन येणे बाकी आहे. परिणामी, रेल्वे मार्गिकेवरील गर्डरचे काम पूर्ण झाले असले तरी पुलापुढील बाजूच्या रस्त्याच्या जागेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा प्रश्न सुटल्यावरच अन्य कामे पूर्ण करून पूल नोव्हेंबरपासून खुला होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 3:02 am

Web Title: hancock bridge will be opened to public by november zws 70
Next Stories
1 नियमभंग खपवून घेणार नाही!
2 मुंबईत ७९४ नवे रुग्ण; २० बाधितांचा मृत्यू
3 बेस्ट आजपासून पूर्ण प्रवासी क्षमतेने
Just Now!
X