येत्या १५ ऑगस्टपर्यंत अपंगांना बेस्ट बसच्या बसमधून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत देण्यात आली नाही, तर आपल्या दालनात घुसून आपल्यावर खुनी हल्ला करण्यात येईल, असा इशारा बृहन्महाराष्ट्र अपंग विकास संघटनेच्या पदाधिकाऱ्याने पत्र पाठवून महापौरांना दिला आहे. अपंगांच्या मागण्या तातडीने मंजूर करण्याचे पत्र पालिका आयुक्तांना, तर आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे यासाठी महापौरांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठविले आहे.

बेस्ट उपक्रमाच्या बसमधून अपंगांना विनामूल्य प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी बृहन्महाराष्ट्र अपंग विकास संघटनेतर्फे सातत्याने करण्यात येत आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

‘अपंग कायदा १९९५’मधील कलम ४३ नुसार अपंग व्यक्तींसाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

या तरतुदीपैकी एक कोटी रक्कम बेस्ट उपक्रमास द्यावी आणि अपंगांना बेस्टच्या बसगाडय़ांमधून विनामूल्य प्रवास करण्याची सवलत द्यावी, अशी फेरमागणी संघटनेचे कार्यकारी संचालक श्रीराम नरेंद्र पाटणकर यांनी महापौर स्नेहल आंबेकर यांना पत्र पाठवून केली आहे. महापौरांनी तातडीने पालिकेतील गटनेत्यांची बैठक बोलवावी आणि त्यात निर्णय घेऊन ही सुविधा अपंगांना मिळवून द्यावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या रकमेपैकी एक कोटी रुपये बेस्टला देण्याची विनंती करुन सात महिने लोटले. मात्र अद्याप ही रक्कम बेस्टला देण्यात आलेली नाही. आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही सवलत देऊन अपंगांची मते आपल्या खिशात टाकण्याचा पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपचा डाव आहे. मात्र येत्या १५ ऑगस्टपर्यंत अपंगांना ही सवलत देण्यात आली नाही तर आपल्या दालनात घुसून आपल्यावर खुनी हल्ला करण्यात येईल, असा इशारा पाटणकर यांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

पाटणकर यांनी हल्ला करण्याचा इशारा दिल्यानंतर महापौरांनी पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र पाठविली आहेत.

अपंगांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा आणि लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य कराव्या, असे स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. पाटणकर यांनी पाठविलेल्या पत्राचे गांभीर्य लक्षात घेऊन आपल्याला पोलीस संरक्षण द्यावे, अशी विनंती आंबेकर यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.