News Flash

पायाच्या अंगठय़ात, दातांत कुंचला धरून भविष्याचे सुखद चित्र

आतंरराष्ट्रीय पातळीवर ही चित्रे एक ते दोन लाखांपर्यंत विकली जातात.

अपंगांच्या चित्रांना लाखांचे मोल

जन्मापासूनच अपंगत्व असतानाही न खचता मुंबईतील तीन चित्रकार आज देशभरात नावारूपाला आलेले आहे. जन्मापासूनच दोन्ही हात गमावल्यानंतर पुढील आयुष्य कुटुंबीयांवर अवलंबून न राहता हे तिघे पायाच्या अंगठय़ात व दातांमध्ये कुंचला पकडून कॅनव्हासवर यशाचे फटकारे मारत आहेत. त्यांच्या कलेला परदेशात चांगलीच मागणी असून आतंरराष्ट्रीय पातळीवर ही चित्रे एक ते दोन लाखांपर्यंत विकली जातात.

अंधेरीत राहणारा ४८ वर्षीय रामकृष्ण नारायण याला सहा महिन्याचा असताना सेरेबल पाल्सी या जर्जर आजाराची लागण झाली होती. तो मोठा होत गेला तसे त्याचे चित्रकलेविषयीचे प्रेम कुटुंबीयांनाही लक्षात आले. मात्र व्यक्तीच्या मूलभूत हालचालीवरच मर्यादा आणणाऱ्या या मेंदूच्या विकारामुळे रामकृष्ण कितपत यश मिळवू शकेल अशी शंका त्यांच्या कुटुंबीयांमध्ये होती. मात्र यावर मात करीत रामकृष्णने पायाच्या साहाय्याने चित्र काढण्यास सुरुवात केली. यात त्याला यशही आले. १९९० मध्ये ‘इंडियन माऊथ अ‍ॅण्ड फूट पेंटिंग्ज आर्टिस्ट’ (इम्प्फा) या संघटनेमध्ये दाखल झाल्यानंतर त्याने चित्रकलेचे विशेष प्रशिक्षण घेतले. भारतातील चेन्नई, दिल्ली यांसारख्या शहरांत त्यांच्या चित्रकलेचे प्रदर्शन भरतात तर काही दिवसांपूर्वी सिंगापूरमध्येही त्याने चित्रकलेचे प्रात्यक्षिक करून दाखविले आहे. यातून त्याला दर महिन्याला १५ ते ३० हजारांपर्यंत उत्पन्नही मिळते. गरीब घरात जन्माला आलेल्या रामकृष्णला शालेय शिक्षण घेता आले नाही, मात्र आज आपल्या कलेमुळे त्याने जागतिक पातळीवर नाव कमावले आहे.

अंधेरीत राहणारा बंदेनवाज नदाफ या २९ वर्षीय तरुणाला जन्मापासूनच डावा हात नाही, तर उजवा हात अगदीच लहान आहे. बंदेनवाजचा जन्म गरीब कुटुंबातील आहे. अपंगत्व असतानाही हिंदी माध्यमातून त्याने आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चित्रकलेची ओढ त्याला फूट पेंटिंग्जपर्यंत घेऊन आली. सुरुवातीला तो घरातच पायाचा अंगठय़ात कुंचला पकडून चित्र काढत होता. २०१५ मध्ये तो इम्प्फा या संघटनेत आला. येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर आता तो संघटनेच्या माध्यमातून काम करीत आहे.

२५ वर्षीय नदिम शेख यालाही जन्मापासून दोन्ही हात नाहीत. अशा परिस्थितीतही केवळ पायाच्या अंगठय़ाने लिहिण्याचा प्रयत्न करीत नदिम दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला.

सध्या इम्प्फा या संघटनेच्या मदतीने नदिम विविध चित्रकलांच्या स्पर्धामध्ये भाग घेत आहे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंब चालविण्याची जबाबदारीही तो चांगल्या प्रकारे सांभाळत आहे.

हे तीनही कलाकार वर्षभरात साधारण २०० ते ३०० चित्र काढतात. आतापर्यंत अमेरिका, स्पेन, सिंगापूर या देशांमध्ये यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे कलाकार निसर्गचित्रांबरोबरच मुक्तहस्त चित्र, मॉडर्न आर्ट, अबस्ट्रॅक्ट, स्टील लाइफ या प्रकारातील चित्रे काढतात.

अपंगत्व असतानाही ही सर्व मुले उत्कृष्ट चित्रकार आहेत. त्याची प्रतिभा आपल्या विचाराच्यापलीकडे आहे. अनेकदा त्यांच्या चित्रांमध्ये खोल अर्थ दडलेला असतो. जो आपल्या डोळ्यांना कधीच दिसत नाही. यांनी काढलेल्या चित्रांचे आम्ही डिजिटायझेशन करतो व त्यांची विक्री करतो. तसा त्यांना दरमहा मानधन दिले जाते.

शिवाय चित्राच्या विक्रीनंतर त्यातील काही भागही दिला जातो, असे इम्प्फा या संघटनेचे भारतातील प्रमुख बॉबी थॉमस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 3:24 am

Web Title: handicap people drawing painter ramkrishna narayan
Next Stories
1 खाऊखुशाल : पोटासोबत मनाची तृप्ती
2 बळीराजासाठी मदत केंद्राचा सिद्धिविनायक चरणी ‘श्रीगणेशा’
3 ‘झोपु’ प्राधिकरणात यापुढे अर्ज, प्रस्ताव सारेच ‘ऑनलाइन’!
Just Now!
X