स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगांच्या शाळांमध्ये या पुढे अनुकंपा तत्त्वावर जिल्हय़ातील कोणत्याही शाळेत रिक्त जागांवर नियुक्त्या करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने घेतला. त्यामुळे सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसास लवकरात लवकर नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एखाद्या शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर त्याच संस्थेत नियुक्ती करण्याचा सध्याचा नियम आहे. संस्था हे एकक मानल्यामुळे तसेच तेथे जागा रिक्त होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी बराच काळ प्रतीक्षा करावी लागते. राज्य सरकारने त्यात बदल करण्याचे ठरविले आहे. आता संस्थेऐवजी जिल्हा एकक मानले आहे. त्यानुसार एखाद्या संस्थेतील कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाल्यास, त्याच्या वारसास त्याच्या जिल्हय़ातील कोणत्याही संस्थेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार आहे. मंत्रिमंडळाने तसा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मृत कर्मचाऱ्याच्या वारसाला नोकरीसाठी आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, त्याला लवकरात लवकर नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या दोन स्वतंत्र अनुकंपा प्रतीक्षा याद्या तयार केल्या जाणार आहेत. दोन्ही प्रकारच्या संस्थांमधील अनुकंपावरील नियुक्त्या या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत दिल्या जाणार आहेत, त्यामुळे वशिलेबाजी व भ्रष्टाचारालाही पायबंद बसणार आहे.