|| हर्षद कशाळकर

करोनालढ्यात ‘स्वदेश फाऊंडेशन’चे मोलाचे योगदान

अलिबाग :  विषाणूकाळात विविध संस्था-संघटना नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्या असून रायगड जिल्ह््यातील ‘स्वदेश फाऊंडेशन’ या संस्थेने स्थानिक प्रशासनास आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

गेली वीस वर्षे ही संस्था जिल्ह्यात कार्यरत असून माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर, महाड व सुधागड या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता, आर्थिक विकास या विषयांवर काम करत आहे. करोनाच्या आरंभापासून संस्था जिल्ह््यात मदतीसाठी सर्वाधिक सक्रिय होती. आता अलिबाग येथील सामान्य रुग्णालय व सात तालुक्यांसाठी लवकरच ५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, ५० मल्टीपॅरा मॉनिटर, आठ रुग्णवाहिका, ५ पीडियाट्रिक व्हेंटिलेटर, १५ पीडियाट्रिक एनआयव्ही (नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन) मास्क, ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १० पीडियाट्रिक मल्टीपॅरा मॉनिटर, १० इन्फ्युजन पंप,  १ पोर्टेबल एक्स-रे मशीन यांसारखी साधनसामुग्री जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच सुपूर्द करणार असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी सांगितले.

टाळेबंदीच्या काळात केंद्र शासनाचा टेलीमेडिसिन ई-संजीवनी ओपीडी हा उपक्रम फाऊंडेशनमार्फत ग्रामीण रायगडमधील ६५० गावांमध्ये पोहोचवण्याचे काम करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या सहकार्याने ५०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करण्यात आले. या उपक्रमास आता सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. याबरोबरच फाऊंडेशन आणि रायगड जिल्हा परिषद यांनी दुर्गम आणि ग्रामीण भागात मोबाइल लसीकरण मोहीम संयुक्तपणे राबवण्याचा निर्णय घेतला. यासाठी संस्थेने तीन मोबाइल व्हॅन उपलब्ध करून दिल्या. यासाठी संस्था आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली.

 

अडकलेल्यांना मदत…

करोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात आरोग्य सुविधांची मोठी कमतरता होती, तेव्हा संस्थेने आवश्यक वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा तर केलाच, पण टाळेबंदीत अडकून पडलेल्या १७ हजारांहून अधिक कुटुंबांना ४५ दिवस पुरेल इतके धान्य आणि मुंबईतून गावाकडे परतलेल्या १२७ कुटुंबांना स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून दिल्या.

वैद्यकीय आधार…  मार्च महिन्याच्या सुरुवातीला करोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यावर फाऊंडेशनने ‘स्वदेस कोविड-१९ रिलीफ अँड रिकव्हरी फॉर महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम सुरू केली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलेल्या विनंतीनुसार करोनाबाधितांवरील उपचारांसाठी आठ मोबाइल व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. तसेच ४० हजार मुखपट्ट्यांचे वितरण करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या समुपदेशन मोहिमेत ५४ जणांनी सहभाग घेतला व त्यांच्यामार्फत करोनाबाधितांचे- त्यातही प्रामुख्याने गृहविलगीकरणातील रुग्णांचे समुपदेशन सुरू झाले.

करोना व टाळेबंदीच्या काळात संस्थेने आपले सामाजिक दायित्व लक्षात घेऊन काम सुरू ठेवले. आरोग्य व्यवस्था बळकट व्हावी यासाठी शासनाला मदत करण्यावर आम्ही भर देत आहोत. – तुषार इनामदार, उपसंचालक, स्वदेश फाऊंडेशन