महिलांसाठी मोफत मुतारीचे आश्वासन देऊनही दोन वर्षांत फारशी हालचाल न केलेल्या पालिका आयुक्तांना या दिवाळीत वेगळ्या प्रकारे शुभेच्छा देण्याची ‘गांधीगिरी’ राइट टू पीचे कार्यकर्ते करत आहेत. सार्वजनिक शौचालयातील महिलांच्या मुतारीची अवस्था दाखवणाऱ्या छायाचित्रासह आयुक्तांना सर्वच कार्यकर्त्यांकडून ही शुभेच्छापत्र पाठवली जातील.
साफसफाई, मंगलमय वातावरणात दिवाळी साजरी करण्याची प्रथा असली तरी सरकारच्या उदासीनतेमुळे शहरातील लाखो रहिवाशांची सकाळ सार्वजनिक शौचालयातील भयंकर दर्शनाने होते. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही मोफत मुतारी असायला हवी, याबाबत सर्वच अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे तत्त्वत समर्थन असले तरी राइट टू पी आंदोलनाला तीन वर्षे होऊनही याबाबत फारशी हालचाल झालेली नाही. अधिकाऱ्यांच्या या उदासीनतेला उत्तर म्हणून यावेळी दिवाळी शुभेच्छापत्र पाठवली जाणार आहेत. महिला मुतारीच्या अवस्थेची नेमकी स्थिती दाखवणाऱ्या फोटोसह दिवाळीच्या हॅ’पी’ शुभेच्छा दिल्या जातील. सार्वजनिक शौचालये व मुतारींची हीच अवस्था पाहून भारतीय रोज आपल्या ‘अच्छे दिन’ची सुरुवात करतात, तुम्हीही हे छायाचित्र पाहून शुभ दिवाळीची सुरूवात करा, या ओळीसह आयुक्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे राइट टू पीच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आहे.