वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान

मुंबई : शिवसेनेने विचारसरणी बदलेली नाही आणि शिवसैनिक देशाचा पंतप्रधान झाला तर आनंदच होईल, असे सूचक विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आता राष्ट्रीय राजकारणात रस घेणार असल्याचे संके त दिले.

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील प्रत्येक राज्यात शिवसेनेच्या शाखांचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन युवानेते आदित्य ठाकरे यांनी के ल्याने हिंदुत्ववादी पक्ष म्हणून देशात पक्षाचा विस्तार करण्याची शिवसेनेची महत्त्वाकांक्षा स्पष्ट झाली आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून राज्यभरातील पक्षाचे नेते-उपनेते, प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन सोहळा होता. एरवी हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होतो. पण करोनामुळे दूरचित्रसंवादाचे माध्यम निवडण्यात आले.

विश्वास ठेवणे हा आमचा दुबळेपणा नव्हे तर संस्कृती आहे. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ ही आमची संस्कृती आहे. शिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. शिवसेनेशी राजकारण करण्याचा प्रयत्न झाला ते मोडीत काढायचे मी ठरवले. त्यामुळेच मुख्यमंत्रिपद स्वीकारले. अन्याय सहन करू नका, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

‘गाव तिथे शाखा’ : तुम्ही आता राज्याचे नेतृत्व समर्थपणे करत आहात. तुम्ही देशाचे नेतृत्व करावे ही महाराष्ट्रातील लोकांची आता इच्छा आहे, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी के ले होते. त्याचा संदर्भ घेत शिवसैनिक देशाचा पंतप्रधान झाल्यास आनंदच होईल, असे विधान उद्धव ठाकरे यांनी के ले. तर गाव तिथे शाखा हे काम आपल्याला हाती घ्यायचे आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यात आपली शिवसेनेची शाखा असायला पाहिजे आणि त्या शाखेचा आवाज बुलंद करायचा आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रीय पातळीवर शिवसेना वाढवण्याचा मानस व्यक्त केला.

विचारसरणीत बदल नाही!

शिवसेनेने विचारसरणी बदलेली नाही. शिवसेना कुणापुढेही लाचार होणार नाही, अशी ग्वाही देत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व व मराठी माणसाच्या मुद्दय़ापासून पक्ष दूर जाण्याची शिवसैनिकांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न के ला. प्रत्येक संकटात शिवसैनिक धावून जात आहेत. चक्रीवादळ असो की करोनाचे संकट, शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा असल्याचेही ठाकरे म्हणाले.