27 February 2021

News Flash

पनवेल-कर्जत थेट लोकल चार वर्षांनंतरच

एमयूटीपी-३ अंतर्गत असलेल्या पनवेल ते कर्जत नवीन दुहेरी मार्गाचे प्रत्यक्षात काम एका महिन्यानंतर सुरू होणार आहे.

 

महिनाभरात प्रत्यक्ष कामाला सुरुवात

मुंबई : हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आणखी एक पर्याय ठरू शकणारी पनवेल ते कर्जत लोकलसेवा सुरू होण्यासाठी आणखी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. एमयूटीपी-३ अंतर्गत असलेल्या पनवेल ते कर्जत नवीन दुहेरी मार्गाचे प्रत्यक्षात काम एका महिन्यानंतर सुरू होणार आहे. मात्र, या मार्गावरील कामे पूर्ण करेपर्यंत २०२४ साल उजाडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पनवेल ते कर्जत सध्या एकच मार्गिका असून लांब पल्ल्याच्या गाड्या किंवा मालवाहतुकीसाठी त्याचा वापर होत असतो. कर्जत आणि पनवेलमधील प्रवासासाठी व्हाया ठाणे किंवा कुर्ला मार्गे लोकलने जावे लागते. अन्यथा रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा लागतो. मात्र त्यात बराच वेळ जातो. जर पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरू झाल्यास त्याचा फायदा अनेक प्रवाशांना मिळू शकतो. त्यासाठी येथे नवीन उपनगरीय मार्गिका बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांचा खर्च १० हजार ९४७ कोटी रुपये असून यातील २ हजार ७८३ कोटी रुपये पनवेल ते कर्जत दुहेरी मार्गासाठी खर्च होणार आहे. एमयूटीपी-३ ला डिसेंबर २०१६ ला मंजुरी मिळाली, परंतु यातील कळवा ते ऐरोली उन्नत मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरणासह पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग इत्यादी प्रकल्प निधी, निविदा व भूसंपादनातील अडचणींमुळे पुढेच सरकू  शकलेच नाहीत.

पनवेल ते कर्जत उपनगरीय दुहेरी मार्ग प्रकल्प राबवण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी काढलेल्या निविदांना मे २०१९ मध्ये मंजुरी मिळाली. आता त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर काही सर्वेक्षण व अन्य कामे बाकी आहेत. एका महिन्यात ती पूर्ण करून त्यानंतर प्रत्यक्षात या मार्गिकेचे काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. करोनामुळेही मध्यंतरी प्रकल्पाचे काम थांबले होते, परंतु आता ते सुरू करण्यात आले. दुहेरी उपनगरी मार्ग तयार करण्यासाठी चार वर्षे लागणार आहेत. यात सध्याच्या पनवेल येथील मार्गिकेवरूनच उन्नत मार्गिका उभारण्यात येईल व काही अंतर संपताच ही नवी मार्गिका उतरेल. त्यासाठी छोटा उन्नत पूलही उभारला जाईल. अशाच प्रकारचे काम कर्जत स्थानकातही केले जाणार आहे.

प्रस्तावित स्थानके

या दुहेरी मार्गिकेमुळे पनवेल ते कर्जतदरम्यान राहणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे. प्रकल्पात पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असतील. याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग इत्यादी कामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. दुहेरी मार्ग साधारण २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते, मात्र आता त्याला आणखी विलंब होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 2:13 am

Web Title: harbor and central railway panvel to karjat direct local train akp 94
Next Stories
1 कर थकबाकीदार विकासकांना सवलत नको!
2 प्राध्यापकांची वणवण
3 एकनाथ खडसे यांची साडेसहा तास चौकशी
Just Now!
X