हार्बर मार्गावर गोरेगावपासून बोरिवलीपर्यंत करण्यात येणाऱ्या विस्ताराच्या प्रकल्पाचा अहवाल बनवण्याचे काम करण्याची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असून हा अहवाल हाती येण्यास सहा महिने लागणार आहेत. त्यानंतर पुढची प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष विस्तारीकण कामाला सप्टेंबरनंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे. परिणामी हार्बर मार्गावरील प्रवाशांना या सेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल, सीएसएमटी ते अंधेरी, गोरेगावदरम्यान लोकल धावते. यापूर्वी गोरेगावऐवजी सीएसएमटी ते अंधेरीपर्यंत हार्बर सेवा सुरू होती. अनेक प्रवासी हार्बर मार्गावर सीएसएमटी ते अंधेरी दरम्यान प्रवास करून नंतर पश्चिम रेल्वेने पुढे जात होते. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हार्बर सेवेचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळ करीत होते. हे काम मार्गी लागण्यास डिसेंबर २०१७ उजाडले. अनंत अडचणींमुळे प्रत्यक्षात गोरेगावपर्यंत लोकल गाडय़ा मार्च २०१९ पासून धावू लागल्या. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर गोरेगावपर्यंत असलेली हार्बर सेवा बोरिवलीपर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण, नियोजन, प्रकल्पाचा खर्च, भूसंपादन इत्यादींसाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची पश्चिम रेल्वेने तयारी सुरू केली. फेब्रुवारीत स्वारस्य प्रस्ताव मागविण्यात आले होते. जवळपास १३ सल्लागारांनी यात उत्सुकता दाखवली. करोनामुळे लागू टाळेबंदीमुळे हे काम पूर्णपणे थांबले. नोव्हेंबरमध्ये सल्लागार नियुक्त होणार होती. त्यानंतर तीन-चार महिन्यांत त्यांचा अहवाल पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे यासाठी आणखी पाच ते सहा महिने लागणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकू र यांनी दिली. सल्लागाराने अहवाल सादर के ल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी निविदा काढण्यात येतील. निविदा प्रक्रि येसाठीही दोन ते तीन महिने लागतील व ती पूर्ण के ल्यानंतरच बोरिवली हार्बर विस्ताराचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.

विरापर्यंतही हार्बर

या विस्तार प्रकल्पानंतर हार्बर बोरिवलीपासून विरापर्यंतही पुढे नेण्याचा प्रयत्न असणार आहे. सध्या बोरिवलीपर्यंत पाच मार्ग असून सहावा मार्गही होणार आहे. तर आणखी हार्बरच्या दोन मार्गिकांची भर पडेल. त्यामुळे आठ मार्गिका बोरिवलीपर्यंत होतील. हे काम एमआरव्हीसीमार्फत होईल. त्यामुळे सीएसएमटीपासून थेट विरापर्यंत हार्बरनेही जाता येणे शक्य होणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्टय़े

* प्रकल्पाचा खर्च ८२५ कोटी रुपये

* हार्बरचा बोरिवलीपर्यंत विस्तार होताच २०३१ पर्यंत प्रवासी संख्येत आणखी २ लाखांची भर पडेल. त्यामुळे या मार्गावर एकूण प्रवासी संख्या १० लाखांवर पोहोचेल.

* गोरेगाव ते बोरिवली हार्बरचा विस्तार करताना यात खासगी व रेल्वेच्या काही बांधकामांवर हातोडा पडणार आहे. यामध्ये रेल्वे इमारत, उपाहारगृह, नियंत्रण कक्ष, आरक्षण केंद्र इत्यादींचा समावेश आहे.