जूनऐवजी आता ऑगस्ट महिन्याची आशा

हार्बर मार्गावर अखेर पहिली १२ डब्यांची गाडी धावली असली, तरी या एकाच गाडीमुळे प्रवाशांची धावपळ होत आहे. हळूहळू या मार्गावरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न चालू असले, तरी त्यासाठी रेल्वेने ठरवलेली १५ जूनची मुदत पुढे ढकलावी लागत आहे. आता हार्बर मार्गावरील सर्व गाडय़ा १२ डब्यांच्या होण्यासाठी १५ ऑगस्टची वाट पाहावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हार्बर मार्गावर २९ एप्रिल रोजी १२ डब्यांची पहिली गाडी धावली. सध्या या गाडीमार्फत १४ फेऱ्या दिवसभरात चालवल्या जात आहेत. पुढील आठवडय़ात यात आणखी एका गाडीची भर पडेल. मे अखेपर्यंत एकूण सहा गाडय़ा १२ डब्यांच्या होणार आहेत. तर हार्बर मार्गावरील सर्वच्या सर्व ३६ गाडय़ा १२ डब्यांच्या होण्यासाठी ऑगस्ट मध्यापर्यंतचा वेळ लागणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

याआधी रेल्वेच्या नियोजनाप्रमाणे एप्रिल मध्यापासून हार्बर मार्गावर १२ डब्यांच्या गाडय़ा धावण्यास सुरुवात होणार होती. पण पश्चिम रेल्वेकडून गाडय़ा न आल्याने पहिली १२ डब्यांची गाडी चालवण्याचा मुहूर्त १५ दिवस पुढे ढकलला गेला. पश्चिम रेल्वेकडून येत्या काही दिवसांमध्ये आणखी दोन गाडय़ा मध्य रेल्वेला मिळणार आहेत. त्यापैकी एक गाडी तातडीने हार्बर मार्गावर चालवण्यात येईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्यानंतर सध्या चालत असलेल्या नऊ डब्यांच्या एका गाडीचे तीन-तीन डबे उर्वरित तीन गाडय़ांना जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्या तीन गाडय़ाही मे अखेपर्यंत सेवेत येणार आहेत.

त्यामुळे जूनच्या सुरुवातीला फक्त सहा गाडय़ा १२ डब्यांच्या असतील. त्यापुढे नऊ ते १२ डबे करण्यासाठी मध्य रेल्वेला पूर्णपणे पश्चिम रेल्वेवर विसंबून राहावे लागणार आहे. त्यासाठी ऑगस्टच्या मध्यापर्यंत थांबावे लागेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.