18 October 2019

News Flash

एका बॅगमुळे हार्बर रेल्वे विस्कळीत; पेंटाग्राफला आग

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धुर पसरल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.

अज्ञात व्यक्तीने रेल्वेच्या पेंटाग्राफवर बॅग फेकल्यानं आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. अनेकदा घडणाऱ्या प्रकारांमुळे सध्या पोलिसांनी रेल्वे मार्गावर गस्त घालण्यास सुरूवात केली आहे. तरीही अद्याप असे प्रतार सुरूच आहेत.

First Published on October 9, 2019 11:24 am

Web Title: harbor railway trains delayed vashi station pantograph man throws bag jud 87