ठाण्याहून शेवटची गाडी आणखी उशिरा

२६ जानेवारीचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न
हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवांची संख्या वाढवणारे आणि ट्रान्स हार्बरवरील शेवटची गाडी ठाणे स्थानकातून आणखी उशिराने सोडण्याचे नियोजन करणारे मध्य रेल्वेचे नवे उपनगरीय वेळापत्रक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी गेले आहे. त्यात काही किरकोळ फेरफार करून ते मान्य होईल, असा विश्वास रेल्वे अधिकारी व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे २६ जानेवारीपासून हे नवे वेळापत्रक लागू करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे करत आहे. या नव्या वेळापत्रकानुसार ट्रान्स हार्बर मार्गावर किमान २० आणि हार्बर मार्गावर किमान पाच सेवा वाढणार आहेत. ट्रान्स हार्बर मार्गावर सध्या ठाण्याहून रात्री ११.४५ वाजता शेवटची गाडी सुटते. नव्या नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी आणखी १५ ते २० मिनिटे उशिराने सुटेल.
सध्या हार्बर मार्गावर गर्दीच्या वेळेत प्रत्येक गाडीत २९८३ प्रवासी प्रवास करतात. तसेच सकाळच्या वेळी गोवंडी-कुर्ला आणि वडाळा-रे रोड या स्थानकांदरम्यान जास्त गर्दी असते, तर संध्याकाळी डॉकयार्ड रोड-वडाळा आणि कुर्ला-गोवंडी या स्थानकांदरम्यान गर्दीची घनता जास्त असते. हा विचार करून आता हार्बर मार्गावर पनवेल-वडाळा किंवा वाशी-वडाळा यांदरम्यान फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. वाढीव फेऱ्यांची संख्या कमीत कमी पाच एवढी असून यापैकी एक किंवा दोन फेऱ्या थेट सीएसटीपर्यंत येतील.
त्याशिवाय, गेल्या काही वर्षांत ट्रान्स हार्बर मार्गावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन या मार्गावरील फेऱ्या वाढवण्याचा विचारही या वेळापत्रकात करण्यात आला आहे. या मार्गावर किमान २० फेऱ्या वाढवण्याचे नियोजन असून त्यात ठाणे-पनवेल या फेऱ्यांमध्ये विशेष वाढ सुचवण्यात आली आहे.
मुख्य मार्गावर सेवा वाढवण्यासाठी गाडय़ांची कमतरता असल्याने मुख्य मार्गावरील वेळापत्रकात सध्या बदल होणार नसल्याचेही रेल्वे सूत्रांनी स्पष्ट केले.