मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची लांबी वाढवणे, रेल्वे रुळांचे दुभाजक (क्रॉसओव्हर) बदलणे, ओव्हरहेड वायरचे काम करणे, स्टेबलिंग लाइन हटवणे अशा विविध कामांसाठी मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने घेतलेला ७२ तासांचा ब्लॉक यशस्वी झाल्याची माहिती एमआरव्हीसी तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. हा ब्लॉक रविवार-सोमवारच्या मध्यरात्री १.३० वाजता संपणार असला, तरी रविवारी संध्याकाळपर्यंतच बहुतांश कामे पूर्ण झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी हार्बर मार्गावरून कामाला येणाऱ्या प्रवाशांना कोणताही त्रास होणार नसल्याची हमी रेल्वेने दिली आहे. रेल्वे कामगार, अधिकारी असे ४००-५०० लोक अहोरात्र काम करत होते.