डीसी-एसी चाचणी यशस्वी; प्रवाशांना दिलासा
हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील बहुचर्चित आणि बहुप्रलंबित डीसी-एसी विद्युतप्रवाह परिवर्तनाची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बारा डब्यांची गाडी चालवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लवकरच परिवर्तनासाठी विशेष ब्लॉक घेऊन एसी विद्युत प्रवाहावर गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
देशभरात सध्या केवळ हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरच सर्व गाडय़ा ‘डीसी’ विद्युतप्रवाहावर चालतात. तर एसी प्रवाहावर धावणाऱ्या गाडय़ांमुळे मोठय़ा प्रमाणात ऊर्जेची बचत होते. याच धर्तीवर हार्बर मार्गावरही तातडीने डीसी-एसी परिवर्तन केले जावे. यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न केले जात होते. मात्र अखेर शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत डीसी ते एसी विद्युत प्रवाहाची चाचणी घेण्यात आली. आणि रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले.
सध्या हार्बर मार्गावर ३६ गाडय़ा सेवेत आहेत. त्यापकी १७ गाडय़ा डीसी-एसी या दोन्ही विद्युत प्रवाहांवर चालणाऱ्या आहेत.
तर १९ गाडय़ा डीसी विद्युत प्रवाहावर चालतात. त्यामुळे एसी विद्युत प्रवाहावर चालणाऱ्या नव्या गाडय़ा मिळताच विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर सुरुवातीला केवळ नऊ डब्यांच्या गाडय़ा तर एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बारा डब्यांची गाडी चालवण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने सर्व गाडय़ा बारा डब्यांच्या करण्यात येतील, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हार्बर मार्गावर तब्बल २०० फेऱ्या बारा डब्यांच्या चालविण्यात येणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२०० फेऱ्या १२ डब्यांच्या
एकूण ३६ गाडय़ांपकी २० गाडय़ा ३० एप्रिलपर्यंत बारा डब्यांच्या करण्यात येतील. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात हार्बर मार्गावरील तब्बल २०० फेऱ्या बारा डब्यांच्या चालविण्यात येतील, असे सांगण्यात आले.