हार्बर मार्गावरील सात वाढीव फेऱ्यांमुळे २० हजार प्रवासी सामावले जाणार
जास्त गर्दी असलेल्या स्थानकांदरम्यानच्या प्रवाशांना दिलासा

मध्य रेल्वेमार्गावर येत्या २६ जानेवारीपासून ४० फेऱ्या वाढवणाऱ्या वेळापत्रकावर आता मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर हार्बर मार्गावरील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. गेल्या अनेक वर्षांत हार्बर मार्गावरील प्रवासी संख्येत घसघशीत वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत फेऱ्यांची संख्या किंवा डब्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. आता या नव्या वेळापत्रकात हार्बर मार्गावर सात नव्या फेऱ्या जाहीर झाल्याने या मार्गावरील प्रवासी वहन क्षमता २० हजारांनी वाढली आहे.
हार्बर मार्गावर अजूनही नऊ डब्यांच्या गाडय़ा चालतात. सध्या हार्बर मार्गावर ५८३ सेवा चालवल्या जातात. मात्र गेल्या काही वर्षांत या मार्गावरील प्रवासी संख्या वाढल्याने या सेवा पुरेशा नाहीत. या मार्गावरील प्रवाशांनी वारंवार मागणी करूनही गेल्या दोन वर्षांत एकही सेवा वाढवण्यात आली नव्हती. मात्र आता वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वेने आगामी वेळापत्रकात हार्बर मार्गावरील सात फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या हार्बर मार्गावर गर्दीच्या वेळी एका गाडीतून २९८३ लोक प्रवास करतात, असे मध्य रेल्वेची आकडेवारी सांगते. मुख्य मार्गावर ही प्रवासी संख्या ४६८९ एवढी प्रचंड आहे. हार्बर मार्गावर सात फेऱ्या वाढवल्यानंतर या मार्गावरील साधारण २० हजारांपेक्षा जास्त प्रवाशांना दिलासा मिळेल. या फेऱ्या वडाळा ते पनवेल यांदरम्यान वाढवण्याचा मध्य रेल्वेचा विचार असल्याचेही रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट होत आहे.
हार्बर मार्गावर सकाळी गोवंडी ते कुर्ला आणि वडाळा ते रे रोड यांदरम्यान जास्त गर्दी असते. तर संध्याकाळच्या वेळेत डॉकयार्ड रोड ते वडाळा आणि कुर्ला ते गोवंडी यांदरम्यान सर्वाधिक गर्दी असते. गर्दीच्या वेळा आणि गर्दीची स्थानके लक्षात घेऊनच या फेऱ्या वाढवणार असल्याचे मध्य रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. मात्र या जादा फेऱ्यांमुळे हार्बर मार्गावरील गर्दी कमी होऊन त्यामुळे होणारे अपघात नक्कीच टळतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.