डीसी-एसी परिवर्तनानंतर आठवडाभरात सेवा सुरू
रेल्वेच्या डीसी-एसी परिवर्तनाचा प्रवाशांना प्रत्यक्ष फायदा काय, असा सवाल विचारण्यात येत असतानाच या परिवर्तनाचे चांगले परिणाम लवकरच प्रवाशांना अनुभवायला मिळणार आहेत. हार्बर मार्गावरील वाढत्या प्रवासी गर्दीवर तोडगा म्हणून येत्या आठवडाभरात १० नव्या सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद यांनी दिली. डीसी-एसी परिवर्तनामुळे हे शक्य होणार असून नव्या सेवांनंतर हार्बरवरील लोकलफेऱ्यांची संख्या ६००वर पोहोचणार आहे.
गेल्या काही वर्षांत हार्बर मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची वाढ झाली होती. वाशी ते पनवेल या टप्प्यात अनेक नवीन वसाहत संकुले झाल्यामुळे तेथील लोकसंख्येत वाढ झाली. त्याचा परिणाम रेल्वेच्या प्रवासी संख्येवरही झाला. मात्र गेल्या चार वर्षांत अपुऱ्या गाडय़ा, डीसी विद्युतप्रवाह अशा अनेक कारणांमुळे हार्बर मार्गावरील सेवांमध्ये वाढ करणे मध्य रेल्वेला शक्य नव्हते.
आता पश्चिम रेल्वेवर बंबार्डिअर गाडय़ा येत असून तेथील सिमेन्स कंपनीच्या गाडय़ा मध्य रेल्वेवर दाखल होत आहेत. हार्बर मार्गावरही या गाडय़ा चालवल्या जात असून त्यामुळे येथील गाडय़ांची संख्या वाढली आहे. तसेच डीसी-एसी परिवर्तन पूर्ण झाल्याने आणखी नव्या व वेगवान गाडय़ा हार्बरवर चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्वाचा विचार करून येत्या आठवडाभरात हार्बर मार्गावर १० नव्या सेवा चालवण्यात येतील, अशी माहिती ब्रिगेडिअर सूद यांनी दिली.
यापैकी काही सेवा वडाळ्याहून पनवेल, वाशी या दिशेने जातील, तर काही सेवा थेट सीएसटी-पनवेल, वाशी येथे जातील. अंधेरी, वांद्रे या मार्गावरील सेवांमध्येही वाढ होईल. या सेवांपैकी किमान चार सेवा गर्दीच्या वेळेत सुरू करण्याचा विचारही ब्रिगेडिअर सूद यांनी बोलून दाखवला. या दहा नव्या सेवांमुळे तसेच महिन्याभरात हार्बर मार्गावर दाखल होणाऱ्या १२ डब्यांच्या गाडय़ांमुळे हार्बरकरांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.