रात्री बरोबर दहाच्या ठोक्याला सतारीच्या तारांतून कोसळणारा सुरांचा धबधबा आटला आणि अवघे रसिक अस्वस्थ झाले. वेळेच्या मर्यादेमुळे कार्यक्रम थांबवणे भागच होते, मात्र रसिकांची अतृप्ती पहाता त्या जगविख्यात सतारियाने आणखी अर्धा तास बठक जमवली आणि सतारवादनाचा कळसाध्याय लिहीला गेला. हा लोकप्रिय सतारिया म्हणजे पं. बुधादित्य मुखर्जी. ‘लोकसत्ता’ प्रस्तुत तीन दिवसीय ‘हृदयेश फेस्टिव्हल’ला शनिवारपासून सुरुवात झाली आणि गारठवणाऱ्या थंडीतही गर्दी करत पहिल्याच दिवशी रसिकांनी मैफलीतील कलावंताना ऊर्जा दिली.
मुंबईतील ‘सवाई गंधर्व महोत्सव’ अशी मान्यता लाभलेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. सतीश व्यास, अश्विनी भिडे-देशपांडे आणि पं. बुधादित्य मुखर्जी यांनी कलाविष्कार सादर केला. मात्र, बुधादित्य यांनी अखेरच्या सत्रात केलेले सतारवादन पहिल्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून आपले वडील बिमलेंदू मुखर्जी यांच्याकडून सतारवादनाची दीक्षा घेणाऱ्या बुधादित्य यांचा मुंबईत अभावानेच कलाविष्कार पहायला मिळतो. शनिवारी ही उणीव भरुन निघाली. मफलीच्या सुरुवातीला त्यांनी आनंदी कल्याण या रागाची निवड केली. विलंबित तसेच दृत लयीत हा राग उलगडून त्यांनी अनोखे नादब्रह्म निर्माण केले. या वादनाला आणखी उठाव आणला तो त्यांना तबल्यावर साथ करणाऱ्या ओजस अढिया या तरुण कलाकाराने. ओजसने बुधादित्य यांना समजून-उमजून केलेल्या साथीमुळे आनंदी कल्याण रंगतच गेला. तासाभराने मैफल थांबल्यानंतर अवघ्या प्रेक्षागाराने बुधादित्य यांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली, या गौरवामुळे भारावलेल्या बुधादित्य यांनी पुन्हा बठक जमवण्याचा निर्णय घेतला आणि रसिकांना सुखद धक्का दिला. यानंतर अर्धा तास त्यांनी त्यांच्या आवडत्या पिलू रागातील बंदिश सादर करुन रसिकांची मागणी पूर्ण केली. ‘एवढ्या चोखंदळ आणि कलासक्त रसिकांसमोर सतारवादन करणे, हे मी माझे भाग्य समजतो,’ असे प्रांजळ मनोगत बुधादित्य यांनी व्यक्त केले.
त्यापूर्वी महोत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पं. सतीश व्यास यांच्या बहारदार संतुरवादनाने झाली. व्यास यांनी प्रथम मधुवंती राग सादर केला. आलापी, त्रिताल, झपताल अशा विविध प्रकारे त्यांनी तब्बल तासभर हा राग खुलवला. यानंतर किरवाणी रागातील बंदिशीद्वारे त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला.  संतुरवादनानंतर ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांनी आपल्या गायनाने मैफलीला वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवले. या महोत्सवाचे निवेदन आनंद सिंग यांनी केले, तर हृदयेश आर्टसचे प्रमुख अविनाश प्रभावळकर यांनी कलाकारांचे स्वागत केले.