मतमोजणी केंद्रांसह शहरभर कडेकोट बंदोबस्त; अफवांवरही करडी नजर

लोकसभा निवडणुकीतील मुंबईतील सहा मतदारसंघांची मतमोजणी गोरेगाव, विक्रोळी, शिवडी या तीन ठिकाणी होणार असून त्यासाठी १२ हजार सरकारी कर्मचारी व अठराशेहून अधिक पोलिसांचे बळ तैनात करण्यात आले आहे. निवडणूक मतमोजणीच्या प्रत्येक फेरीवर पोलिसांचे लक्ष असेल. अनपेक्षित, धक्कादायक निकालाचे संकेत मिळताच परिस्थितीनुसार बंदोबस्ताची व्यूहरचना आखण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आयुक्तांनी शहरवासीयांना केले आहे.

प्रत्येक मतदारसंघाकरिता दोन हजार सरकारी कर्मचारी मतमोजणीकरिता देण्यात आले आहेत. गोरेगावच्या विस्तीर्ण अशा नेस्को मैदानावर उत्तर मुंबई, उत्तर मध्य, वायव्य या मतदारसंघातील मतांची मोजणी होणार आहे. तर विक्रोळीच्या उदयांचल स्कूल येथे ईशान्य मुंबई व शिवडीतील वेअर हाऊसमध्ये दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या तिन्ही केंद्रांना स्थानिक पोलिसांसह शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, केंद्रीय आणि राज्य राखीव पोलिसांचा बंदोबस्त असेल. सुमारे दीड हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या केंद्राभोवती तैनात असतील, अशी माहिती पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी दिली.

अनपेक्षित किंवा धक्कादायक निकालांचे संकेत मिळताच राजकीय कार्यकर्त्यांकडून कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता आहे. ती लक्षात घेऊन मोजणी केंद्र, उमेदवारांचे निवासस्थान, कार्यालये, प्रभावाखालील परिसरात अधिक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मोजणीनंतर संपूर्ण शहरात राजकीय कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू होतो. त्यातून दोन गटांमध्ये हाणामाऱ्या, दंगलसदृश परिस्थिती उद्भवू शकते. ही शक्यता लक्षात घेऊन शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवल्याचे सिंगे यांनी सांगितले.

मिरवणुकांमुळे वाहतूक कोंडी होऊ  नये यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना आखल्या आहेत. निकालानंतर जल्लोष करताना तेढ निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करू नका, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

लोकसभा मतदारसंघ

८४

एकूण मोजणी टेबल

१४

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मोजणी टेबल

चापर्यंत चित्र स्पष्ट?

* सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सर्वप्रथम पोस्टल मते मोजली जातील. त्यानंतर ईव्हीएमची मोजणी होईल. त्यानंतर प्रत्येक विधानसभेतून पाच व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाईल. थोडक्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघावर ३० व्हीव्हीपॅटची मोजणी होईल. ही मते ईव्हीएमच्या मतांशी जुळणे आवश्यक राहील. त्यामुळे दुपापर्यंत मतदानाचा कल समजेल. चापर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. प्रत्यक्ष निकाल व्हीव्हीपॅटची मोजणी झाल्यानंतरच जाहीर केला जाईल.

* शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्क्रीन लावून सर्वसामान्य जनतेला निकाल जाणून घेण्याची सोय निवडणूक आयोगाने केली आहे. महत्त्वाचे सिग्नल, सार्वजनिक ठिकाणे, वरळी सीफेस, हाजी अली जंक्शन, वांद्रे एस व्ही रोड यांसह मंत्रालयाच्या आत व बाहेर ही सोय असेल.