मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ‘अर्थकारणा’चे आरोप करून मनसेत आपली घुसमट होत असल्याचे सांगत कन्नड विधानसभेचे येथील मनसेचे अमदार हर्षवर्धन जाधव यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे दिला. हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनाम्यामुळे तसेच राज यांच्यावर केलेल्या थेट आरोपांमुळे मनसेत खळबळ उडाली असून गुरुवारी औरंगाबाद येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे
मनसे सोडण्याची घोषणा यापूर्वीही आमदार जाधव यांनी केली होती. मात्र राज यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याचे टाळले. मात्र आज राज ठाकरे यांच्यावर थेट टीकेची तोफ डागतच हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी राज आपल्याशी दूरध्वनीवरून अत्यंत असभ्य भाषेत बोलल्याचे सांगून आपल्यालाही स्वाभिमान असल्याचे ते म्हणाले. पोलिसांनी आपल्याला मारल्यानंतर राज यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली होती. मात्र त्यानंतर झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आपल्या मारहाणीचा साधा उल्लेखही केला नाही. पाचव्या दिवशी मी गटनेते बाळा नांदगावकर यांना विचारले असता यापेक्षाही अनेक महत्त्वाचे विषय असल्याचे त्यांनी सांगितले. अखेर शिवसेनेने मारहाणीचा विषय उपस्थित केला.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मनसेला आठ जागा मिळाल्यनंतरही पक्ष प्रमुखाच्या संमतीने आर्थिक व्यवहार करून जिल्हापरिषद राष्ट्रवादीला दिल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठवाडय़ात पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत आपल्याला कोणतेच स्थान नाही. जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना पाठबळ देण्यात येत असून ही घुसमट सहन करणे शक्य नसल्यानेच आपण राजीनाम देत असल्याचे हर्षवर्धन जाधव यांचे म्हणणे आहे.