मुंबई :काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास राज्यातील तीन-चार जागांवरून वाद होऊ शकतो यापैकी एक असलेल्या पुणे जिल्हय़ातील इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे संकेत काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले असले तरी राष्ट्रवादी आपल्याकडे असलेल्या जागेवर पाणी सोडेल का, हा खरा प्रश्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सध्या अस्वस्थ आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास आपले भवितव्य काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दत्ता भारणे इंदापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. परिणामी आघाडी झाल्यास या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा राहणार आहे. कारण आघाडीत ज्या पक्षाचा आमदार तो मतदारसंघ त्या पक्षाकडे कायम ठेवण्याचे धोरण ठरलेले आहे. यामुळे काँग्रेसच्या वाटय़ाला हा मतदारसंघ येणार नाही. हा धोका ओळखूनच जून महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाने आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी मांडली होती. पण दिल्लीने पाटील यांना उमेदवारी दिली नाही.

काँग्रेसला इंदापूर मतदारसंघ न मिळाल्यास आपले राजकीय भवितव्य कठीण आहे हे लक्षात आल्यानेच पाटील यांनी भाजपशी संधान साधल्याची मध्यंतरी चर्चा होती. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे बोलले जात होते. अर्थात, पाटील यांनी या खेळीचा इन्कार केला होता. हर्षवर्धन पाटील यांची ही नाराजी लक्षात घेऊनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलेले वक्तव्य सूचक मानले जाते. हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनाच उमेदवारी मिळेल, असा दिलासा अशोकरावांनी दिला. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पातळीवर निर्णय घेतला जाईल, असेही चव्हाण यांनी जाहीर केले.

अजितदादांची भूमिका महत्त्वाची

हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय भवितव्याबाबत अजित पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कोणत्याही परिस्थितीत इंदापूर मतदारसंघाची अदलाबदल केली जाणार नाही, असे मागे अजितदादांनी स्पष्ट केले होते. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील ताणले गेलेले संबंध सर्वश्रुत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी इंदापूर विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. कारण सुप्रियाताईंच्या बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरचा समावेश होतो. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटले, पण इंदापूरमध्ये त्यांना चांगली मते मिळाली होती. शहरी भागात वातावरण भाजपला अनुकूल असल्याने सुप्रिया सुळे यांना खडकवासला मतदारसंघात जास्त मतांची अपेक्षा नाही. दौंड, इंदापूर, बारामती, पूरंदर आणि भोर या पाच मतदारसंघांत त्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अनुकूल भूमिका घेतली तरच राष्ट्रवादी या मतदारसंघावरील दावा मागे घेऊ शकेल.

गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यापासून राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भारणे यांनी मतदारसंघात बऱ्यापैकी पकड बसविली आहे. नगरपालिका निवडणूक हर्षवर्धन पाटील यांनी जिंकली असली तरी बाजार समिती त्यांच्या हातून गेली. अशोक चव्हाण यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या आशा पल्लवित केल्या असल्या तरी राष्ट्रवादी व विशेषत: अजितदादा कोणती भूमिका घेतात यावर सारे अवलंबून आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshvardhan patil will be candidate for indapur constituency
First published on: 07-09-2018 at 04:49 IST