राज्याची वीजनिर्मिती कंपनी असलेल्या महानिर्मितीमध्ये वित्त संचालकासह अनेक पदे रिक्त असताना व त्यांचा अतिरिक्त कार्यभार इतरांवर असताना संचालक संचालन या पदावरील नियुक्तीसाठी अवघ्या तीन दिवसांच्या मुदतीने मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे केवळ याच पदासाठी ही लगीनघाई का, अशी चर्चा महानिर्मितीमध्ये सुरू झाली आहे.

महानिर्मिती ही राज्य सरकारच्या अखत्यारीतील वीजनिर्मिती कंपनी असून औष्णिक प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प, सौरऊर्जा प्रकल्प, वायूवर आधारित वीजप्रकल्प असा मोठा पसारा आहे. विद्यमान संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पदासाठी महानिर्मितीने १४ जुलै रोजी भरती प्रक्रि या सुरू केली. अर्ज भरण्याची मुदत एकदा वाढवून ती १४ ऑगस्ट अशी करण्यात आली. या टप्प्यापर्यंत सर्व प्रक्रि या व्यवस्थित पार पडली, मात्र त्यानंतर २७ ऑगस्टपर्यंत कसलीही हालचाल नव्हती. अचानक संचालक संचालनपदासाठी सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन मुलाखती होतील असे २७ व २८ ऑगस्टला सर्व उमेदवारांना कळवण्यात आले. त्यामुळे केवळ तीन दिवसांची मुदत देऊन मुलाखतीची ही लगीनघाई का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

१४ ऑगस्टनंतरचे १४ दिवस काहीच हालचाल नाही व अचानक मुलाखतीचा निरोप येतो. तसेच मंत्रिमंडळासह विविध बैठकांसाठी मंत्री-वरिष्ठ अधिकारी सुरक्षित अंतर ठेवून समोरासमोर येत असतील तर मोजक्या व्यक्तींची हजेरी असते, अशा मुलाखतीसाठी ऑनलाइनचा अवलंब कशासाठी, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

विशेष म्हणजे याच महानिर्मितीमध्ये वित्त विभागाचे संचालकपदासह कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता अशी अनेक पदे रिक्त आहेत. त्यांचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे आहे. त्याच धर्तीवर काही दिवस कार्यकारी संचालकांकडे कार्यभार ठेवून मुलाखत प्रक्रिया व्यवस्थित राबवणे शक्य असताना महानिर्मितीने संचालक संचालनपदाच्या भरतीसाठी केलेली लगीनघाई ही कोणा विशिष्ट उमेदवाराच्या निवडीचा सोपस्कार पार पाडण्यासाठी आहे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

स्पष्टीकरण असे..

* याबाबत महानिर्मितीची भूमिका समजून घेण्यासाठी विचारणा केली असता, ही प्रक्रिया राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनी राबवत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सूत्रधार कंपनीच्या जनसंपर्क विभागाकडे विचारणा केली असता, उमेदवार अर्जाची छाननी झाल्यावर ऊर्जा विभागाच्या सूचनेनुसार मुलाखतीचा दिवस निश्चित झाला.

* सोमवारी मुलाखत होणार असा निरोप आल्याबरोबर २७ व २८ ऑगस्टला सर्व उमेदवारांना त्याची माहिती कळवण्यात आली. या पदासाठी इतर राज्यांतील उमेदवारांचे अर्जही आले आहेत. त्यांना लगेचच मुलाखतीसाठी बोलावणे करोनाच्या निर्बंधांमुळे व्यवहार्य नसल्याने ऑनलाइन मुलाखत होत आहे.

* इतर अनेक पदे रिक्त असली तरी संचालक संचालन यांच्यावर सर्व वीज प्रकल्पांच्या नियंत्रणाची जबाबदारी असते, त्यामुळे ते पद रिक्त होण्याआधी नवीन अधिकारी निश्चित करण्यासाठी लगेचच मुलाखत घेतली जात आहे, असे सूत्रधार कंपनीच्या जनसंपर्क  विभागाचे पी. एस. पाटील यांनी स्पष्ट केले.