लग्नानंतरही पत्नीचे प्रेमप्रकरण सुरूच असणे ही क्रूरता असून अशा प्रकरणांमध्ये व्यभिचाराच्या मुद्दय़ावर पती घटस्फोट मागू शकतो, असा निर्वाळा कुटुंब न्यायालयाने दिला आहे.
लग्नापूर्वीपासून आपले प्रेमसंबंध आहेत आणि वडिलांच्या दबावाखाली केलेले हे लग्न आपल्याला नको असल्याचे सांगत लग्नानंतर दोन महिन्यांतच पतीला सोडून जाणाऱ्या पत्नीची वागणूक क्रूरतेच्या संकल्पनेत मोडत असल्याचे स्पष्ट करीत कुटुंब न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश लक्ष्मीराव यांनी पतीची काडीमोडची मागणी मंजूर केली. क्रूरता आणि व्यभिचार अशा दोन मुद्दय़ांवर न्यायालयाने हा घटस्फोट मंजूर केला.
पतीच्या अर्जानुसार, २४ जून २०१२ रोजी नेरूळ येथे या दाम्पत्याचा विवाह झाला होता. परंतु लग्नानंतर आठवडय़ानेच पत्नी माहेरी निघून गेली. आणायला गेल्यानंतर ती घरी परतली. २२ जुलै २०१२ रोजी तिचे वडील तिला भेटण्यासाठी आले असता ती पुन्हा सर्व कपडे घेऊन त्यांच्यासोबत माहेरी निघून गेली. दोन आठवडे ती माहेरी होती. पतीने वारंवार फोन करूनही ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. उलट तिने त्याच्याशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पती पुन्हा एकदा तिला आणण्यासाठी तिच्या घरी गेला. मात्र परतल्यानंतर तिने त्याला एकदाही जवळ येऊ दिले नाही वा स्पर्शही करू दिला नाही.
दरम्यान, एके दिवशी तिच्या भावानेच तिला सीबीडी येथील यूटीआय कार्यालयाजवळ पाहिले आणि तिचे प्रेमप्रकरण समोर आले. पत्नीने सत्य लपवून आपली फसवणूक केल्याचा आरोप करीत पतीने अखेर घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली. पत्नीला अनेकदा नोटीस बजावल्यानंतरही ती न्यायालयात हजर न राहिल्याने एकतर्फी निर्णय देत न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केला.