फॅशन स्ट्रीटपाठोपाठ आता नरिमन पॉइंट परिसरातील जमनालाल बजाज मार्गावरील फेरीवाले पालिकेच्या रडारवर आले आहेत. परवान्यातील अटींचा भंग करून व्यवसाय करणाऱ्या तब्बल ४१ फेरीवाल्यांवर पालिकेने नोटीस बजावली आहे. तसेच या फेरीवाल्यांविरोधात पालिकेने खटलाही दाखल केला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

जमनालाल बजाज मार्गावर ४५ फेरीवाले असून त्यांना परवाने देण्यात आले आहेत. काही फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय भाडय़ाने चालविण्यास दिला आहे. काही फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे अतिरिक्त जागा व्यापली असून याची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. परवान्यामधील अटी आणि शर्तीचा भंग करणाऱ्या ४५ पैकी ४० परवानाधारक फेरीवाल्यांवर पालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. पुढील आठवडय़ात पुन्हा एकदा जमनालाल बजाज मार्गावरील अधिकृत फेरीवाल्यांची पाहणी करण्यात येणार आहे. पाहणीदरम्यान अटी आणि शर्तीचा भंग केल्याचे आढळल्यास, तसेच व्यवसायाच्या ठिकाणी ज्याच्या नावावर परवाना आहे ती व्यक्ती आढळली नाही, तर परवाना रद्द करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. जमनालाल बजाज मार्गावरील फेरीवाल्यांना पानपट्टी, सिगारेट आदी विक्रीचा परवाना देण्यात आला आहे. मात्र असे असतानाही त्यांनी सर्रास खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.