रेल्वे स्थानकांपासून दीडशे मीटर परिसरात व्यवसायास मनाई; दादरला कबुतरखान्यापर्यंत मज्जाव

रेल्वेस्थानकांपासून १५० मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई करणारा उच्च न्यायालयाचा आदेश हाती येण्याआधीच मुंबई महापालिकेने महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांबाहेर फेरीवाल्यांकरिता ‘लक्ष्मणरेषा’ आखण्यास सुरुवात केली आहे. दादरसारख्या फेरीवाल्यांनी सदैव गजबजलेल्या स्थानकाच्या पश्चिमेकडे कबुतरखान्यापर्यंतच्या परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दादर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या चार मार्गावरील १५० मीटरच्या अंतरावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पांढऱ्या रंगाच्या सीमारेषा आखल्या आहेत. दादर पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा जावळे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, रानडे मार्ग आणि सेनापती बापट मार्गावर या सीमारेषा आखण्यात आल्या असून पालिका अधिकाऱ्यांकडून रेषेअलीकडे बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जात आहे. या सीमारेषांमुळे फेरीवाल्यांची हद्द निश्चित होऊन चारही मार्ग मोकळे झाल्याचे चित्र दिसत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २००९मध्येच धार्मिक स्थळे, शैक्षणिक संकुल, महापालिका मंडय़ा आणि रुग्णालयांच्या परिसरात १०० मीटपर्यंतच्या परिसरात फेरीवाल्यांना मज्जाव केला होता. रेल्वे स्थानकांकरिता हे अंतर १५० मीटर इतके आहे. या निर्णयाला अधोरेखित करत १ नोव्हेंबरला निकाल देत उच्च न्यायालयाने पादचारी व प्रवाशांच्या हक्कांना प्राधान्य देत फेरीवाल्यांच्या सीमारेषा निश्चित केल्या. यापूर्वी हद्द निश्चित नसल्याने कारवाईदरम्यान कवी केशवसुत पुलाखालून उठविण्यात आलेले फेरीवाले रानडे रोड किंवा कबुतरखान्याजवळ जाऊन बसत. त्यामुळे कारवाई करताना पालिका अधिकाऱ्यांचा गोंधळ उडत असे. मात्र बुधवारी सकाळी आखण्यात आलेल्या या सीमारेषांमुळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना सोयीचे झाले आहे, असे जी-उत्तर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

पादचाऱ्यांचा प्रवास जलद

या सीमारेषांमुळे दादर स्थानक परिसर फेरीवालामुक्त झाल्याने स्थानिक रहिवासी, पादचारी, प्रवासी आणि दुकानदारही सुखावले आहेत. आधी  रेल्वे स्थानकाच्या प्रवेशावरच फेरीवाले गराडा घालून बसत. सणासुदीच्या काळात फुलविक्रेते संपूर्ण परिसरच काबीज करत असत. या काळात स्थानकापासून कबुतरखान्यापर्यंत पोहचण्यास १५ ते २० मिनिटे लागत होती. फेरीवाल्यांना हटविल्यापासून अवघ्या दोन-तीन मिनिटात हे अंतर कापता येते, असे प्रवासी रुपेश मोरे यांनी सांगितले.किमान रेषेअलीकडील परिसर तरी मोकळा झाल्याने सहज वावरता येते, असे रहिवासी सदानंद पितळे यांनी सांगितले.

फेरीवालामुक्त रस्त्यावर वाहनांचे अतिक्रमण

फेरीवालामुक्त झालेल्या रेल्वेस्थानक परिसरात आता गाडय़ांनी अतिक्रमण केले आहे. दादर पश्चिमेला रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिवसभर उभ्या राहिलेल्या दुचाकी व पुढे लावलेल्या चारचाकींमुळे परिसरातील कोंडी कायम आहे. ‘फेरीवाल्यांच्या तुलनेत गाडय़ा पाचपट जास्त जागा अडवतात आणि त्यामुळे पालिकेला कोणताही महसूल मिळत नाही. फेरीवाल्यांविरोधात बोलणाऱ्या रहिवासी संघटना वाहनतळाच्या धोरणाच्या विरोधात का आहेत, याचा विचार करायला हवा,’ असे मत वाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी व्यक्त केले.

नियमानुसार रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर अंतरावरील परिसरात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आहे. २००९च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही या सीमारेषा आखल्या आहेत. रेषेअलीकडे बसणाऱ्या फेरीवाल्यांवर सक्त कारवाई करता यावी, यासाठी या सीमारेषा आखण्यात आल्या आहेत.

– रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त-जी-उत्तर विभाग