पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या सूचना-हरकती गोळा करण्याचे आदेश

परप्रांतीयांपाठोपाठ अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात खळ्ळखटय़ाक करणाऱ्या मनसेने आता पालिकेच्या ‘फेरीवाला क्षेत्रा’विरोधात एल्गार पुकारला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या विभागात पालिकेने निश्चित केलेल्या ‘फेरीवाला क्षेत्रा’च्या आसपासच्या परिसरात जनजागृतीची मोहीम हाती घेतली असून ‘फेरीवाला क्षेत्रा’बाबत नागरिकांडून सूचना आणि हरकती गोळा करून त्या पालिका प्रशासनाच्या हवाली करण्यात येणार आहे.

दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळील एम. बी. राऊत मार्ग आणि केळुस्कर मार्ग येथे ‘फेरीवाला क्षेत्र’ निश्चित करण्यात आले आहे असून तेथे अनुक्रमे १० आणि २० फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. याला मनसेकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. शाळेपासून १०० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव आहे. एम. बी. राऊत मार्ग आणि केळुस्कर मार्गाजवळ अशा आहे. असे असताना पालिकेने तेथे ‘फेरीवाला क्षेत्र’ कसे काय निश्चित केला, असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.  घराजवळ ‘फेरीवाला क्षेत्र’ निश्चित करण्यात आल्याचे समजताच राज ठाकरे यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता मनसेच्या विभागप्रमुखांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुंबईमधील विभाग अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

नागरिकांच्या हरकती पालिकेकडे

विभाग अध्यक्षांनी स्वत:च्या परिसरातील ‘फेरीवाला क्षेत्रा’ची पाहणी करावी आणि ‘फेरीवाला क्षेत्रा’चा अभ्यास करून आसपासच्या नागरिकांकडून त्याबाबत सूचना आणि हरकती गोळा कराव्या, असे आदेश राज ठाकरे यांनी या बैठकीत दिले. विभाग अध्यक्षांनी गोळा केलेल्या नागरिकांच्या सूचना आणि हरकती पालिकेला सादर करण्याचा मानस राज यांनी या बैठकीत व्यक्त केला. विभाग अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या ‘फेरीवाला क्षेत्रा’ची यादी देण्यात आली.