धोकादायक थरांवरील दहीहंडीला आणि बालगोविंदांवरील बंदीचा उच्च न्यायालयाचा निर्णय योग्यच असल्याचे मत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, परंपरेनुसार दहीहंडी उत्सव जल्लोषातच साजरा झाला पाहिजे असेही ते म्हणाले.
धोकादायक थरांवर आणि बालगोविंदांवर न्यायालयाने घातलेल्या बंदीचे उध्दव ठाकरे यांनी समर्थन केले. तसेच अलीकडच्या काळात दहिहंडीचा जो मेगा इव्हेंट सुरू झाला आहे तो चुकीचा आहे. यातून दहीहंडी उत्सव व जीवघेणी स्पर्धा यामध्ये सुवर्णमध्यसाधून हा सण साजरा झालाच पाहिजे अशी भूमिका उध्दव ठाकरे यांनी घेतली आहे. दहिहंडी सण परंपरागत चालत आला आहे त्यामुळे तो जल्लोषात साजरा झालाच पाहिजे पण, सण हा सण असावा त्याचे इव्हेंटमध्ये रुपांतर होणे योग्य नाही असेही उध्दव ठाकरे म्हणाले. तसेच दहीहंडी उत्सवाच्या इव्हेंटचा वापर राजकीय फायद्यासाठी करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याआधी बालगोविंदांच्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर सेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दहिहंडीचा मेगा इव्हेंट रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सर्व शिवसैनिकांनी उत्सव साजरा करावा मात्र, त्याचे इव्हेंटमध्ये रूपांतर करु नये असे आवाहन देखील उध्दव यांनी केले आहे.