हिट अॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खान याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी १ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. या खटल्यातील पुरावे आणि कागदपत्रे अद्याप सरकारी आणि बचाव पक्षाला उपलब्ध झाले नसल्याचे सलमान खानचे वकील अमित देसाई यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांनी १ जुलैपर्यंत सुनावणी स्थगित केली. कागदपत्रांची पूर्तता लवकरात लवकर करावी, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
सलमान खानच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा प्रवास..
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याला अखेर सत्र न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निकालाविरोधात सलमान खानने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने त्याची याचिका दाखल करून घेताना सत्र न्यायालयाचा निकाल स्थगित केला होता आणि सलमान खानला सत्र न्यायालयाकडून जामीनाची मुदत वाढवून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. उन्हाळ्याच्या सुटीनंतर १५ जून रोजी या खटल्याची सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले होते. मात्र, कागदोपत्री कार्यवाही पूर्ण न झाल्याने सुनावणी १ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आली.