कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरण प्रकल्पातील अनियमिततांसंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका फेटाळण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या याचिकेला देण्यात आलेले आव्हान न्यायालयाने फेटाळले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माथनकर यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कोंढाणे प्रकल्पाचे काम करणाऱया एफ. ए. कन्स्ट्रक्शनतर्फे निसार खत्री यांनी या जनहित याचिकेला आव्हान दिले होते. दमानिया आणि माथनकर यांची जमीन धरणात जात असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. यामध्ये त्यांचे वैयक्तिक हितसंबंध असल्यामुळे न्यायालयाने त्यांची जनहित याचिका फेटाळावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र, या जनहित याचिकेला आव्हान देता येणार नाही, असे स्पष्ट करीत त्यावरील सुनावणी सुरूच राहिल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
कोंढाणे धरण प्रकल्पाच्या कामातील अनियमिततेप्रकरणी जलसंपदा विभागातील चार अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली असून आणखी सात जणांची चौकशी सुरू आहे. सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.