दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याचा दावा करून त्यांच्या मालमत्तेत हिस्सा मागणाऱ्या अनिता अडवाणी हिने वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांकडे खन्ना कुटुंबियांविरुद्ध केलेल्या तक्रारीला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी १७ डिसेंबपर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे खन्ना यांची पत्नी डिम्पल कपाडिया, जावई अक्षय कुमार आणि मुली ट्विंकल व रिंकी यांना मंगळवारी वांद्रे न्यायालयात हजर राहावे लागणार नाही.
अडवाणी हिने आपण तडजोडीसाठी तयार असल्याचे सांगितल्यावर खन्ना कुटुंबियाने ४ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहावे, असे आदेश वांद्रे न्यायालयाने दिले होते. त्या पाश्र्वभूमीवर या चौघांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्यापुढे त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी अ‍ॅड्. शिरीष गुप्ते यांनी अडवाणी हिला खन्ना कुटुंबाविरुद्ध घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार करता येऊ शकत नाही, असा युक्तिवाद केला. खन्ना आणि अडवाणी दोघेही विवाहित असून त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा प्रकरणांत घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार करता येऊ शकत नाही. त्यामुळे अडवाणी हिचा दावा चुकीचा असल्याचा युक्तिवाद अ‍ॅड्. गुप्ते यांनी केला.
आपण खन्ना यांची कायदेशीर पत्नी असून त्यांचा मृत्यू होईपर्यंत आपण त्यांची पत्नीच होतो. त्यांच्याशी आपले घनिष्ट संबंध असल्याचा दावा करून कुणी दुसरी महिला त्यांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागू शकत नाही, असा दावा डिम्पल हिने याचिकेत केला आहे.