X

सिद्धार्थ संघवीच्या हत्येपुर्वीची २० मिनिटं, अजून एकावर झाला होता हल्ल्याचा प्रयत्न

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्दार्थ संघवी यांच्या हत्या प्रकरणी सरफराज शेख याला अटक करण्यात आली आहे

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्दार्थ संघवी यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी सरफराज शेख याने आपण संघवी यांची हत्या करण्याआधी चोरीच्या उद्देशाने एका व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न केला होता अशी माहिती पोलिसांना दिली आहे. लोअर परळ येथील कमला मिलमधील पार्किंगमध्ये आलेल्या त्या व्यक्तीवर हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानेच २० मिनिटांनंतर आलेल्या सिद्धार्थ संघवी यांची हत्या करण्यात आल्याचा खुलासा त्याने पोलिसांसमोर केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराज शेख याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, ५ सप्टेंबरच्या संध्याकाळी जेव्हा मी कामावर नव्हतो तेव्हा पार्किंगमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करायचं ठरवलं होतं. ‘सुरुवातीला आपण घाबरलेलो होतो पण जेव्हा पार्किंगमध्ये पाहिलेल्या पहिल्या व्यक्तीच्या कारजवळ पोहोचलो तेव्हा तो घाबरला आणि वेगाने कार पळवत निघून गेला. नंतर २० मिनिटं वाट पाहिली. २० मिनिटांनी संघवी आपल्या कारजवळ जात असल्याचं दिसलं’, असं शेखने पोलिसांना सांगितलं आहे.

आरोपी शेख याने आपण हत्या केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पार्किंगमध्येच थांबलो होतो असंही पोलिसांना सांगितलं आहे. ८ वाजता हत्या केल्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत शेख तिथेच थांबला होता. त्याला आपण वाहतूक कोंडीत अडकू अशी भीती वाटत होती. त्याने मृतदेह आपल्या दोन पायांच्या मधोमध ठेवला होता. आपण काहीतरी काम करत असल्याचं तो भासवत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.

एन एम जोशी मार्ग पोलीस शेखने संघवी यांच्याआधी ज्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला साक्षीदार म्हणून उभं केलं जाऊ शकतं. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी शेखच्या कोपरखैरणे येथील घरावर छापा टाकत पासपोर्ट आणि बँक स्टेटमेंट जप्त केलं.

भोईवाडा कोर्टाने आरोपीला १९ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. ‘आम्ही त्याने दिलेली माहिती पडताळून पाहत आहोत. त्याने याआधी अनेकदा वेगवेगळी माहिती देत आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर खातरजमा न करता विश्वास ठेऊ शकत नाही’, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.