एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी हे बुधवारपासून बेपत्ता झाले असून गुरुवारी त्यांची कार नवी मुंबईतील ऐरोली येथे सापडली. कारच्या सीटवर रक्ताचे डाग असून संघवी यांच्याबाबत अद्याप कोणतीही मिळू शकलेली नाही. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

एचडीएफसीमध्ये उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेले संघवी यांचे कार्यालय कमला मिल्स येथे आहे. पत्नी आणि चार वर्षांच्या मुलासह ते मलबार हिल येथे राहतात. बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ते ऑफीसला जाण्यासाठी घरातून निघाले. यानंतरही ते घरी परतलेले नाही. एन एम जोशी मार्ग पोलिसांनी या प्रकरणी मिसिंगची तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

‘बुधवारी संध्याकाळी साडे सातच्या सुमारास संघवी ऑफीसमधून निघाले. कार्यालयातून बाहेर पडताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. मात्र, कमला मिलमधून त्यांची कार बाहेर पडताना दिसली नाही’, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कमला मिलमधून बाहेर पडण्यापूर्वीच संघवी यांचा फोन बंद होता. रात्री १० पर्यंत संघवी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि शेवटी त्यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ऐरोलीतील सेक्टर ११ येथे संघवी यांची कार सापडली. कारच्या सीटवर रक्ताचे डाग आहेत, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले.