मुंबई : गैरव्यवहारामुळे अडचणीत असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) ‘हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर’ला (एचडीआयएल) गोरेगाव येथील म्हाडाच्या पत्रा चाळ प्रकल्पावरही ७५ कोटींचे कर्ज दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा प्रकल्प म्हाडाने ‘एचडीआयएल’ला दिला नसतानाही बँकेने कुठल्या आधारावर कर्ज दिले याचीही आता सक्तवसुली महासंचालनालय चौकशी करण्याची शक्यता आहे. म्हाडाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे का, याचीही चौकशी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पत्रा चाळ प्रकल्प म्हाडाने गुरुआशीष कन्स्ट्रक्शन कंपनीला पुनर्विकासासाठी दिला होता. ६७२ रहिवाशांचे पुनर्वसन करून काही भूखंडावर म्हाडाला घरे बांधून द्यायची होती, तर उर्वरित भूखंडावर खुल्या बाजारात विक्रीसाठी घरे बांधली जाणार होती. परंतु हा प्रकल्प गुरुआशीषने राबविला नाही, तर ‘एचडीआयएल’ कंपनीने प्रवर्तकाची भूमिका बजावत हा प्रकल्प राबविला. या प्रकल्पातील खुल्या बाजारात विक्री करावयाचे चटईक्षेत्रफळ सात कंपन्यांना विकण्यात आले. या माध्यमातून गुरुआशीष कंपनीकडे एक हजार कोटी रुपये जमा झाले. मात्र ही रक्कम मिळूनही गुरुआशीष कंपनीने दिवाळखोर घोषित करण्याबाबत राष्ट्रीय कंपनी लवादाकडे अर्ज केला. त्यामुळे हा एक हजार कोटींचा निधी कुठे गेला, हेही गुलदस्त्यात आहे.  ‘एचडीआयएल’चा सहभाग तपासण्याची गरज असल्याचे मत पत्रा चाळ संघर्ष समितीचे मकरंद परब यांनी व्यक्त केले.

पत्रा चाळ प्रकल्पाशी संबंधित असलेल्या ‘मेडोज्’ या गृहप्रकल्पातील ६१० सदनिकांपैकी १४५ सदनिका विकण्यात आल्या नव्हत्या. त्यापैकी ६० सदनिका पंजाब अँड महाराष्ट्र बँकेकडे गहाण ठेवून ‘एचडीआयएल’ने त्यावर ७५ कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.