विद्यर्थिनीचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचाही समावेश

दांडीबहाद्दर आणि शिस्तीला हरताळ फासणाऱ्या पालिका शाळांतील चार मुख्याध्यापक आणि १६ शिक्षकांना पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. पालिका शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या एका मुख्याध्यापकाचा निलंबितांमध्ये समावेश आहे. पालिका शाळांमधील शिक्षकांना शिस्त लागावी, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

पालिका शाळांमधील काही शिक्षक बेशिस्तपणे वर्तन करीत असल्याचे, तसेच काही जण शाळा प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता वारंवार अनुपस्थित राहात असल्याचे आढळून आले आहे. अशा एकूण २० शिक्षकांवर पालिकेच्या शिक्षण विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये चार मुख्याध्यापक आणि १६ शिक्षक-शिक्षिकांचा समावेश आहे. निलंबितांमध्ये उर्दू माध्यमांचे आठ, इंग्रजी माध्यमांचे चार, हिंदी माध्यमांचे चार, मराठी माध्यमांचे तीन आणि गुजराती माध्यमाच्या एका शिक्षकाचा समावेश आहे. मोहिली व्हिलेज येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका यशोदा देवेंद्र त्रिपाठी, डी. एन. नगर हिंदी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र सिंह, माटुंगा लेबर कॅम्प शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विनायक सोहनी आणि काळबादेवी मनपा माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक कमलाकर कुदळे यांचा निलंबितांमध्ये समावेश आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये एक शिक्षिका २०१४ पासून विनापरवानगी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच एका मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.

पालिका शाळांमधील शिक्षकांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच पालिका शाळांमधील कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. बेलगामपणे वागणाऱ्या, तसेच वारंवार अनुपस्थित राहणाऱ्या आणखी काही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

कारवाईची कारणे

शाळा प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहणे, शाळेची घसरलेली शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यादृष्टीने पर्यवेक्षकीय कर्तव्यात कुचराई, अनधिकृतरीत्या संगणकीय हजेरीपटावर उपस्थिती नोंदविणे, कर्तव्यात कसूर करणे आदी ठपका ठेवून शिक्षण विभागाने या २० जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे.