लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

सध्या करोनाची जागतिक साथ सुरू असताना सर्व पालकांच्या मनात आपल्या मुलांना करोना झाला तर काय? अशी चिंता सतावतेय. याशिवाय लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कोणत्याही संसर्गजन्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्यांना हा आजार होऊ शकतो. परंतु अनेक पालक मुलांना लस टोचण्यासाठी घराबाहेर पडणे टाळत आहेत. लहान मुलांना कुठल्याही संसर्गापासून वाचवण्यासाठी लसीकरण करून घेणं हा एकमात्र पर्याय आहे. त्यामुळे आपल्या मुलांना फ्लूची लस द्यायला हवी, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

इन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे होणाऱ्या इन्फेक्शनला ‘सिझनल फ्लू’ असं म्हणतात. या ‘फ्लू’ पासून संरक्षण करण्यासाठी लस उपलब्ध आहे. याला फ्लू शॉट्स असं म्हंटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ‘फ्लू’पासून बचावासाठी लस अत्यंत प्रभावी हत्यार आहे. ‘फ्लू’ विरोधातील लसीमुळे ‘इन्फ्लूएन्झा’ व्हायरसमुळे होणारे गंभीर आजार रोखता येऊ शकतात.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोविड-१९ च्या काळात लहान मुलांना फ्लू-शॉट्स देणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे मुलांना संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. फ्लू शॉट आपल्याला श्वसन संक्रमण आणि इन्फ्लूएन्झापासून मृत्यूला रोखण्यासाठी तसेच त्याच्याशी संबंधित इतर गुंतागुंत रोखण्यास मदत करू शकतो. हे फ्लू शॉट्स सहा महिन्यांवरील मुलांकरिता तसेच प्रौढांकरिता प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत.

याविषयी माहिती देताना खारघर मदरहुड रूग्णालयातील सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. सुरेश बिराजदार म्हणाले, ‘‘ज्या लहान मुलाचे वय नऊ वर्षांपेक्षा कमी असून त्याला एकदाही फ्लूची लस दिलेली नाही अशा मुलांना कमीतकमी दोन फ्लू शॉट्स दयावेत. मुलांना फ्लूची लस कधी टोचावी, याबद्दल पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मुलांना संसर्गापासून वाचवण्यासाठी फ्लूची लस अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय लसीकरण करताना मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्या आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांकडून वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) वापरली जात आहे की नाही याची खात्री करून घ्यावी’’

‘‘घराबाहेर पडल्यावर आणि रूग्णालयात आल्यावर कोविड-१९चा संसर्ग होऊ शकतो. या भितीमुळे अनेक पालक मुलांना लसीकरण करून घेण्यासाठी रूग्णालयात येणं टाळत आहेत. याशिवाय सध्या करोनाची दुसरी लाट येणार असं प्रसारमाध्यमाद्वारे बातमी पसरली जात आहे. त्यामुळे पालकांच्या मनात आणखीन भिती निर्माण झाली आहे. पण मुलांना कोणताही संसर्ग होऊ नये, यासाठी पालकांनी लहान मुलांचे वेळेवर लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. नियमित मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर्सचा वापर कोविड प्रसार रोखण्यासाठी मदत करू शकतो,” असे वाडिया रूग्णालयाचे (लहान मुलांचे) वैद्यकीय संचालक डॉ. शकुंतला प्रभू यांनी सांगितले.