कुपोषण रोखण्यासाठी आरोग्यविषयक जनजागृतीचा व आरोग्य तपासणीचा उपक्रम

पालघरमधील कुपोषणग्रस्त आदिवासी भागात आरोग्य यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. त्यातच दिवाळीच्या निमित्ताने आदिवासींमध्ये व्यापक जागृती व उपचार करण्यासाठी थेट आदिवासी पाडय़ांवर राहून त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी घेतला असून त्यांच्यासह २०० डॉक्टर आदिवासींसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत.

जव्हार व मोखाडय़ातील सत्तर पाडय़ांमध्ये हे दोनशे डॉक्टर आदिवासींच्या घरी राहून दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी डॉक्टर स्वत: फराळाचे सामान घेऊन आदिवासींच्या घरी मुक्काम करणार आहेत. साधारणपणे एका पाडय़ावर तीन डॉक्टर राहणार असून त्यांच्यासमवेत वनवासी कल्याण केंद्राचे स्थानिक कार्यकर्ते व काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारीही राहणार आहेत. धनत्रयोदशीला, २८ ऑक्टोबर रोजी हे सर्व डॉक्टर पालघरला जाणार असून यामध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने, केईएमचे माजी अधिष्ठाता व संचालक डॉ. संजय ओक, वाडिया हॉस्पिटलचे डॉ. मोहन आमडेकर, डॉ. मोहन खामगावकर, डॉ. मुकुंद कसबेकर, आयुषचे संचालक डॉ. कोहली आदी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. आदिवासींबरोबर दिवाळी साजरी करताना त्यांच्यामध्ये आरोग्यविषयक जनजागृतीचा तसेच आरोग्य तपासणीचा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आशा कार्यकर्त्यां, अंगणवाडी सेविका यांनाही सामावून घेण्यात आले आहे. या मोहिमेत युनिसेफ संस्था, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वनवासी कल्याण आश्रम, जनकल्याण समिती, आरोग्य भारती आदी संस्थाही सहभागी होणार असून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आदिवासींसाठी ही आरोग्यदायी दिवाळी कल्पना राबविण्यात येत आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग पुढे सरसावला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनाही कुपोषित आदिवासी भागात उपचारासाठी जावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आदिवासींबरोबर दिवाळी साजरी करताना सर्व डॉक्टर हे पाडय़ावर राहणार असून ते आपल्याबरोबर आदिवासींसाठी दिवाळीचा फराळही नेणार आहेत.

दिवाळीच्या दिवशी लहान मुले, गरोदर महिला तसेच कुमारिकांच्या आरोग्याची तपासणीही हे तज्ज्ञ डॉक्टर्स करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचा मुक्कामही पाडय़ावर!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी विशेष टास्क फोर्स नेमण्याचे आदेश जसे आरोग्य विभागाला दिले आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण विभागानेही याकामी पुढाकार घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा जास्तीत जास्त प्रमाणात दुर्गम आदिवासी भागात उपलब्ध राहावी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. मुख्यमंत्री स्वत: आदिवासींसमवेत दिवाळी साजरी करणार आहेत, तर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे डॉक्टरांसमवेत आदिवासी पाडय़ावर राहणार आहेत.