दिनेश गुणे, मुंबई

आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्नपदार्थ हा प्रत्येकाचा हक्क असून त्याबाबत ग्राहकांनीच जागरूक राहावे यासाठी केंद्र सरकारच्या ‘फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टॅण्डर्डस अथॉरिटी’(एफएसएसएआय) संस्थेने विविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. उपाहारगृहांपासून रस्त्यावर, कोठेही मिळणारे खाद्यपदार्थ सुरक्षित असलेच पाहिजेत, यासाठी या संस्थेने कठोर नियम जारी केले आहेत. १५ ऑक्टोबरपूर्वी त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या खाद्यविक्रेत्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

उपाहारगृह किंवा दुकानातील खाद्यपदार्थ पूर्णपणे सुरक्षित आहेत, याची ग्वाही ग्राहकांना देण्यासाठी दर्शनी भागात विहित नमुन्यातील तसे फलक लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. मुळात, गेल्या फेब्रुवारीतच असा आदेश या संस्थेने जारी केला होता. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मोजक्या उपाहारगृहांनी त्याची अंमलबजावणी केली, तर अनेकांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्षच केले. याची गंभीर दखल ‘एफएसएसएआय’ने घेतली आणि अलीकडेच पुन्हा नव्याने तो आदेश जारी केला. खाद्यपदार्थाच्या सुरक्षिततेची ग्वाही देणारा हा फलक कोणत्या आकारात आणि कोणत्या नमुन्यात असावा यासंबंधीचे निर्देशही जारी करण्यात आले आहेत. येत्या आठवडय़ानंतर तसे फलक दिसले नाहीत, तर थेट तक्रार करा, असे आवाहन ग्राहकांना करण्यात आले आहे. सुरक्षित खाद्यपदार्थाबाबत ग्राहकांनीच जागरूक राहिले पाहिजे, अशी अपेक्षा या मोहिमेतून सूचित झाली आहे.

देशभरातील सर्व उपाहारगृहे तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ग्राहकांच्या सहजपणे नजरेस पडेल अशा जागी १२ बाबींचा स्पष्ट उल्लेख असलेला हा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या फलकावर उपाहारगृहाचे किंवा विक्रेत्याचे नाव, परवाना क्रमांक आणि या १२ बाबींचा उल्लेख असलाच पाहिजे. या १२ बाबी म्हणजे ग्राहकांची ‘आरोग्यसंहिता’ असेल. या उपाहारगृहाचा परिसर नियमितपणे स्वच्छ आणि र्निजतुक केला जातो, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी वापरले जाते, शिजविलेले किंवा शीत अवस्थेतील खाद्यपदार्थ योग्य त्या तापमानात ठेवले जातात, शाकाहारी किंवा मांसाहारी अन्नपदार्थ किंवा कच्चे अन्न ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था तसेच ते शिजविण्यासाठी किंवा कापण्यासाठी स्वतंत्र उपकरणे- हत्यारे, कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ गणवेश किंवा कपडे, प्रत्येक पदार्थ बनविण्याआधी कर्मचाऱ्याची स्वच्छता, जखमा किंवा भाजलेल्या जागेवर वॉटरप्रूफ बँडेज वापरून संसर्ग टाळण्याच्या उपाययोजनेची ग्वाही, आजारी कर्मचाऱ्यास अन्नपदार्थ हाताळण्यास मनाई, टेबल आणि भांडी पुसण्यासाठी स्वतंत्र कपडा आणि ओल्या-सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरापेटय़ा ठेवण्यात आल्याची ग्वाही या फलकाद्वारे ग्राहकांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारे याचे उल्लंघन होत असल्याचे ग्राहकांना आढळल्यास त्यांना थेट तक्रार करता यावी यासाठी ‘एफएसएसएआय’चे संपर्क क्रमांकही या फलकावर असतील.

‘उष्मांकां’ची नोंदही मेन्यू कार्डवर?

आरोग्यदायी खाद्यपदार्थाबाबत आजकाल जागरूकता वाढत असल्याने उपाहारगृहांमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थामधील उष्मांकांचा उल्लेख मेन्यू कार्डमध्येच करावा, अशा सूचनाही ‘एफएसएसएआय’ने केल्या आहेत. प्रत्येक खाद्यपदार्थाच्या पौष्टिकतेबाबत माहिती देणारी पुस्तिका ग्राहकांना उपलब्ध करून दिल्यास त्यानुसार खाद्यपदार्थाची निवड करणे त्यांना सोयीचे होईल, असे या संस्थेस वाटते.

या गोष्टी बंधनकारक

* उपाहारगृह नियमितपणे निर्रजतुक करणे

* खाद्यपदार्थासाठी स्वच्छ पाण्याचा वापर

* खाद्यपदार्थ योग्य तापमानात ठेवणे

* शाकाहारी, मांसाहारी खाद्यपदार्थासाठी स्वतंत्र उपकरणे

* कर्मचाऱ्यांनी स्वच्छ गणवेश वापरणे

* कर्मचारी निरोगी असल्याची वा रुग्ण नसल्याची ग्वाही देणे

* टेबल/भांडी पुसण्यासाठी स्वतंत्र कपडा

* ओल्या-सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरापेटय़ा