मुंबईमध्ये स्वाइन फ्लूच्या साथीचा झालेला प्रादुर्भाव आणि दिवसेंदिवस रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन आरोग्य समितीचा नैनिताल येथे जाणारा अभ्यास दौरा रद्द करण्याचा निर्णय आरोग्य समिती अध्यक्षा गीता गवळी यांनी घेतला. दरम्यान, मुंबईकरांच्या आरोग्याला स्वाइन फ्लूचा धोका असताना मुंबईबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे समिती सदस्यांना दौरा रद्द करण्यात आल्याचे, गीता गवळी यांनी स्पष्ट केले.
आरोग्य समितीचा २६ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात झारखंडमधील नैनिताल येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईत स्वाइन फ्लून डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत आरोग्य समितीच्या सदस्यांनी मुंबई बाहेर अभ्यास दौऱ्यासाठी जाणे योग्य ठरणार नाही. परिणामी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय आपण घेतल्याचे गीता गवळी यांनी स्पष्ट केले.