आरोग्य विभागाकडून विशेष यंत्रणेची निर्मिती

संदीप आचार्य, लोकसत्ता

मुंबई : साथीच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी ‘रिअल टाइम डाटा’ गोळा करून तात्काळ उपाययोजना करणारी यंत्रणा आरोग्य विभागाने तयार केली आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लूसह तब्बल ३३ प्रकारच्या आजारांना तात्काळ अटकाव घालता येईल, असे आरोग्य विभागातील उच्चपदस्थांनी सांगितले.

साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आजारांसंबंधीची माहिती वेळेत मिळणे व त्या माहितीचे योग्य प्रकारे विश्लेषण होणे गरजेचे असते. अशा विश्लेषणामुळे तात्काळ निर्णय घेऊन उपाययोजना करता येणे शक्य होते. आरोग्य विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागांतून साथीच्या आजाराची माहिती गोळा करण्यासाठी एका आठवडय़ाचा कालावधी लागत असे. तथापि केंद्र शासन व जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणानुसार त्याच्या त्याच दिवशी (रिअल टाइम डाटा) माहिती गोळा करण्याला प्राधान्य देण्यात आले. साथीचे आजार तसेच जलजन्य आजारांसह एकूण ३३ प्रकारच्या आजारांची शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्गवारी करणारे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत एखाद्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयातून साथीच्या आजाराची माहिती आल्यानंतर त्याची तालुका, गाव, जिल्हा, वय व स्त्री-पुरुषांसह आवश्यक ती वर्गवारी केली जाते. यातून कोणत्या ठिकाणी किती तीव्रतेचा साथउद्रेक झाला आहे व त्याचे स्वरूप याची तात्काळ माहिती मिळून नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संबंधित ठिकाणी आवश्यक ते उपचार व काळजी घेण्याचे आदेश जारी होतील, असे ‘साथरोग प्रतिबंधक उपचार विभागा’चे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

यासाठी एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ तयार करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नुकतेच झाले. या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून लगेच सतर्कतेचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना मिळणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण :

राज्यातील आरोग्य विभागाची उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळांमधील संबंधित कर्मचाऱ्यांना संगणक, मोबाइल तसेच संपर्काच्या अन्य साधनांद्वारे माहिती कशाप्रकारे भरायची याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातून ‘रिअल टाइम डाटा’ उपलब्ध होणार असून यातून साथरोगावर तात्काळ नियंत्रण मिळविता येईल, असेही डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात ३३ प्रकारचे आजार तसेच रक्ताच्या चाचण्यांचे वर्गीकरण करण्यात येणार असले तरी दुसऱ्या टप्प्यात मधुमेह, रक्तदाबासह असंसर्गजन्य आजारांचाही समावेश करण्यात येणार आहे. यामुळे मधुमेह वा रक्तदाब असलेल्या रुग्णांना वेळोवेळी उपचारासाठी व आवश्यक ती काळजी घेण्यासाठी सतर्क करता येणार आहे.