News Flash

शासकीय डॉक्टरांच्या दुकानदारीला चाप!

कारवाईसाठी आरोग्य विभागाचे स्वतंत्र दक्षता पथक

( संग्रहीत छायाचित्र )

|| संदीप आचार्य

कारवाईसाठी आरोग्य विभागाचे स्वतंत्र दक्षता पथक

आरोग्य विभागाच्या रुग्णालयातील अनेक डॉक्टर हे कामाच्या वेळेत खासगी प्रॅक्टिस करत असल्याचे दिसून आले असून परिणामी शासकीय रुग्णालयांमधील शस्त्रक्रियांचे प्रमाण घटले आहे. याची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने स्वतंत्र दक्षता पथक नेमून खासगी दुकानदारी करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

महात्मा फुले जीवनदायी योजनेत गेल्या सहा वर्षांत एकूण २० लाख ७४ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून यात आरोग्य विभागाच्या ४१ रुग्णालयांमध्ये केवळ ६५,२०६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या एकूण शस्त्रक्रियांमध्ये हे प्रमाण अवघे ३.१ टक्का एवढे आहे. या योजनेसाठी आतापर्यंत ४१८४ कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले असून यात आरोग्य विभागाचा वाटा ९१ कोटी ९३ लाख रुपये आहे. राज्यात आरोग्य विभागाच्या अखत्यारीत जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच स्त्री रुग्णालये मिळून एकूण पाचशे रुग्णालये असून यात एकूण २७,८९५ खाटा आहेत.

गेल्या काही वर्षांत आरोग्य विभागाच्या रुग्णालयात होणाऱ्या शस्त्रक्रियांच्या प्रमाणात सातत्याने घसरण होत असून यामागे अनेक डॉक्टर हे खासगी व्यवसाय करत असल्यामुळे त्याचा फटका बसत असल्याचे आढळून आले आहे. यातील अनेक डॉक्टरांना राजकीय आशीर्वाद असल्यामुळे त्यांच्याविरोधात अद्यापपर्यंत ठोस कारवाई झाली नाही. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी डॉक्टरांच्या या दुकानदारीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी एक आदेश जारी केला असून यात म्हटल्याप्रमाणे कामाच्या वेळेत खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना चाप लावण्यासाठी स्वतंत्र दक्षता पथक नेमण्यात येणार आहे. कामाच्या वेळात रुग्णांची हेळसांड करणारे अथवा खासगी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ. व्यास यांनी स्पष्ट केले आहे.

डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न घेता स्वतंत्र व्यवसाय करायचा असल्यास त्यांनी तो कामाच्या वेळेनंतर करावा. मात्र कामाच्या वेळेत शासकीय सेवेतील डॉक्टर खासगी व्यवसाय करताना आढळल्यास त्याच्यावर निलंबनासह कठोर कारवाई केली जाईल, असे डॉ. व्यास यांनी स्पष्ट केले आहे. या दक्षता पथकाच्या माध्यमातून केवळ आरोग्य विभागाची रुग्णालयेच नव्हे तर प्रथमिक आरोग्य केंद्रांचीही नियमित तपासणी केली जाणार आहे. डॉक्टरांच्या दुकानदारीला चाप लावतानाच रुग्णालयातील स्वच्छता, कर्मचाऱ्यांची रुग्णांबरोबर असलेली वागणूक आणि औषधांचा साठा याचाही आढावा घेतला जाणार आहे.

रुग्णवाहिकेत प्रसुतीचे वाढते प्रकार

ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांना रुग्णालयात वेळेत पोहोचता यावे यासाठी १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. तथापि जवळपास २८ हजार बालकांचा जन्म हा रुग्णवाहिकेत झाल्यामुळे काही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात येत आहेत. बाळंतपणासाठी नेणाऱ्या महिलेला वाटेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी का दाखल केले नाही तसेच तेथे उपचाराची व्यवस्था नव्हती का तसेच डॉक्टरांकडून उपचार करण्यात टाळाटाळ केली जाते का, असे प्रश्न निर्माण झाले असून  गेल्या तीन वर्षांमध्ये शस्त्रक्रियांचे प्रमाण का घसरले याचाही आढावा घेतला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 12:31 am

Web Title: health department doctors private practice at work time
Next Stories
1 राफेलप्रकरणी राहुल गांधींचा खोटारडेपणा उघड
2 वाहनतळ व्यवस्थेसाठी पालिकेची सोसायटय़ांना साद!
3 कांची महास्वामी हे माणसाच्या आंतरिक प्रेरणेचे उदाहरण
Just Now!
X