|| संदीप आचार्य

मे अखेरीस ४०० डॉक्टर निवृत्त होणार

गेल्या काही वर्षांत आरोग्य विभागात सनदी अधिकाऱ्यांची सहा पदे निर्माण करण्यात आली असून त्यापैकी प्रधान सचिव आरोग्य यासह पाच प्रमुख पदांवर सनदी अधिकारी कार्यरत आहेत. मात्र एवढय़ा ‘बाबू’ लोकांची वर्णी लावूनही राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. आरोग्य संचालनालयाचा जवळपास सर्व कारभार ‘हंगामी’ तत्त्वावर चालला असून वरिष्ठ डॉक्टरांसह तब्बल १६,१८१ पदे रिक्त आहेत. यातील गंभीरबाब म्हणजे ३१ मे अखेरीस आरोग्य विभागातील तब्बल ४०० वरिष्ठ डॉक्टर निवृत्त होत असून आपले निवृत्तीचे वय ६० वर्षे करावे अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व शहरी आरोग्य अभियान हे आरोग्य विभागाचे दोन्ही उपक्रम जवळपास कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवावर चालले असून अत्यल्प वेतनावर या विभागात शेकडो लोक काम करत आहेत. याशिवाय राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांपासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतच्या बहुतेक ठिकाणी डॉक्टरांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य विभागाचे बहुतेक उपक्रम हे ताकदीनीशी राबविणे शक्य होत असल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचेच म्हणणे आहे. गंभीरबाब म्हणजे महाराष्ट्राच्या आरोग्याचे संचलन सेंट जॉर्जेस रुग्णालयातील ज्या आरोग्य संचालनालयातून केले जाते तेथे अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच सहाय्यक संचालकांची बहुतेक पदे ही रिक्त असून हंगामी पदोन्नतीच्या माध्यमातून काम करणाऱ्या एकेका डॉक्टरकडे अनेक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातही त्यांच्याकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. एकीकडे पदोन्नती नाही तर दुसरीकडे हातात कोणताही अधिकार नाही यामुळे नैराश्य येत असल्याची भावना यातील अनेक डॉक्टरांनी व्यक्त केली. विद्यमान संचालक डॉ. दिलीप कांबळे यांची राज्य लोकसेवा आयोगाकडून गेल्याच महिन्यात १७ एप्रिल रोजी निवड करण्यात आली असून तेही ३१ मे रोजी निवृत्त होणार आहेत.

आरोग्य संचालक, अतिरिक्त संचालक, सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक आदी वर्ग ‘अ’ च्या एकूण १६५४ पदांपैकी तब्बल १०४४ पदे भरण्यातच आली नसून ६३ टक्के पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी वर्ग ‘२’ची १६०३ पदे रिक्त आहेत तर सामान्य राज्य सेवा गट ‘ब’च्या ९३१ पदांपैकी ७३६ पदे म्हणजे ७९ टक्के पदेच भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय गट ‘क’ गट ‘ड’ची अनुक्रमे ८७०५ व ४०८५ पदे रिक्त आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक हे अत्यंत महत्त्वाचे पद असून एकूण ६४३ मंजूर पदांपैकी ३७७ पदे रिक्त असतील तर ग्रामीण आरोग्य तसेच जिल्हा स्तरावरील आरोग्याची स्थिती किती गंभीर असेल याचा विचार करा असे आरोग्य विभागातील डॉक्टरांचेच म्हणणे आहे. ही आकडेवारी ३१ डिसेंबर २०१७ अखेरची असून मुळातच आरोग्य विभागातील ही पदे १९९१ च्या लोकसंख्येवर आधारित आहेत. यात लोकसंख्या वाढीचा विचारही करण्यात आला नसून येत्या मे अखेरीस ४०० ज्येष्ठ डॉक्टर निवृत्त झाल्यानंतर आरोग्य संचालनालयासह जिल्हा स्तरावरील आरोग्याची पुरती वाताहात होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांत आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची आश्वासने आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी अनेकदा दिली. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनीही विधानसभेत दहा हजार पदे भरण्याचे आश्वासन दिले होते. तथापि आरोग्य विभागाला ‘बाबू’लोकांनी वेढल्यामुळेच आरोग्य विभागाची दुर्गती झाल्याचे येथील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

विशेषज्ञ डॉक्टरांची (सुपरस्पेशालीटी) पदे भरण्याच्या अनेक घोषणा झाल्या परंतु डिसेंबर २०१७ अखेरीस विशेषज्ञांच्या ६२७ पदांपैकी ४६६ म्हणजे ७४ टक्के पदे रिकामी असल्याचे भीषण वास्तव असून याबाबत राज्यातील सर्व जिल्ह्यमध्ये मानसिक आरोग्य संकल्पना राबविण्याच्या बाता मारणारे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी आरोग्य विभागाकडे मानसोपचारतज्ज्ञ व मनोविकारतज्ज्ञ किती आहेत हे तरी एकदा स्पष्ट करावे असे आव्हान येथील डॉक्टरांनी दिले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यंमध्ये २०१५ पासून आत्महत्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविलेल्या कार्यक्रमाची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी केल्यास फसवाफसवीच्या अनेक काहाण्या उघडकीस येतील आणि आरोग्य यंत्रणेतील डॉक्टरच कसे नैराश्यग्रस्त बनले आहेत तेही स्पष्ट होईल, असे आरोग्य संचालनालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.