दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेकडो रुग्णांवर आरोग्य विभागाच्या आठ जिल्हा रुग्णालयांत विशेष उपचार केले जात असून या ‘पॅलेटिव्ह केअर’ची व्याप्ती वाढवून १९ जिल्हा रुग्णालयात  उपचार करण्याची योजना आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

आधुनिक उपचारामुळे एकीकडे माणसाचे जीवनमान वाढत अहे, तर दुसरीकडे दुर्धर आजाराच्या रुग्णसंख्येतही मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसते. कर्करोग, यकृताचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, एचआयव्ही-एड्स आदी दुर्धर आजारांतील शेवटच्या टप्प्यातील रुग्णांवरील वैद्यकीय उपचाराची मर्यादा संपते तेव्हा त्यांना होणाऱ्या वेदना पाहणे तसेच त्यांची सुश्रूषा करणे घरच्यांनाही शक्य होत नाही. अशा दुर्धर आजारांच्या रुग्णांसाठी २०१२ मध्ये केंद्र शासनाने ‘पॅलेटिव्ह केअर’ योजना हाती घेतली.याबाबत आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार म्हणाले, दुर्धर आजाराच्या या रुग्णांना उपचारात्मक चिकित्सा उपयोगाची नसून केवळ वेदना व लक्षणे कमी करणारी चिकित्सा उपयुक्त असते. आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, चार परिचारिका व एका बहुउद्देशीय समाजसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.  या योजनेतील आठही जिल्हा रुग्णालयांत यासाठी दहा खाटा राखून ठेवण्यात आल्या असून २०१४-१५ मध्ये ४१२३ रुग्णांना सेवा देण्यात आली तर २०१५-१६ मध्ये ५३७९ आणि गेल्या वर्षी ९०३९ दुर्धर आजाराच्या रुग्णांची सुश्रूषा करण्यात आल्याचे डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.

देशातील १८० जिल्ह्य़ांत योजना

देशातील १८० जिल्ह्य़ांत ही योजना सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, सातारा व नंदुरबार अशा आठ ठिकाणी जिल्हा रुग्णालयांत सध्या ही योजना सुरू आहे.  नाशिक जिल्हय़ातील इगतपुरी येथे प्रथम प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली होती.