संदीप आचार्य

वयोवृद्ध व्यक्तींना बऱ्याचदा मधुमेह, दृष्टिदोष तसेच अन्य आजारांबरोबर एकाकीपणाचाही सामना करावा लागतो. परिणामी त्यांना मानसिक आधार व उपचाराचीही गरज भासते. त्यामुळे आरोग्य विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये साठीपार केलेल्या वृद्धांसाठी ‘आयुष्यमान भव’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांचे एकाकीपण घालवण्यासाठी गावातील चावडीवर वयोवृद्धांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्याची तयारी केली आहे.

वृद्धापकाळातील समस्यांमध्ये एकाकीपणातून येणारे नैराश्य ही प्रमुख बाब असल्याचे ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि ‘यूएनएफपीए’च्या अहवालात नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने वृद्धांसाठी राष्ट्रीय आरोग्य धोरण तयार करून अंमलबजावणीवर भर दिला.

केंद्राच्या या धोरणानुसार आरोग्य विभागाने ‘टाटा ट्रस्ट’च्या सहकार्याने चंद्रपूर जिल्ह्य़ात जुलै २०१८ मध्ये वृद्धांसाठी सर्वागीण आरोग्य उपक्रम राबवला. चंद्रपूरमधील गावागावांत आरोग्य विभागाचे डॉक्टर, परिचारिका, आशा कार्यकर्त्यां व टाटा ट्रस्टचे कर्मचारी यांनी वृद्धांची आरोग्य तपासणी केली. तसेच मानसिक आरोग्याच्या तपासणीसह त्यांचे एकाकीपण घालवण्यासाठी गावातील चावडीवर ‘मायेची सावली’ हा उपक्रम राबवला. यामध्ये या वृद्धांना मधुमेह, रक्तदाब यांसह वृद्धापकाळातील आजारांचा सामना कसा क रायचा, योगासन, हातापायांना विशिष्ट ताण देणे, मानेचे व्यायाम, तसेच आरोग्यविषयक काळजी कशा प्रकारे घ्यायची याची माहिती तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्यात आली.

वृद्धांचे एकाकीपण घालविण्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रमही राबविण्यात आले. यासाठी ११७ डॉक्टर, ७०९ परिचारिका व २९७ आशा कार्यकर्त्यां यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सुमारे १३,३४७ वृद्धांची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच सप्टेंबर २०१८ अखेपर्यंत २५,१४३ वृद्धांनी गावपातळीवरील प्रथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत या योजनेत आरोग्य सल्ला घेतला. यातून ग्रामीण भागात वृद्धांमध्ये आरोग्यविषयक जागृती होऊ शकली. आपल्या आरोग्याची आपण काळजी घेऊ शकतो, असा एक विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याचे आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.

योजनेचा विस्तार.. वृद्धांच्या आरोग्यासाठीची ही ‘आयुष्यमान भव’ योजना टाटा ट्रस्टच्या सहकार्याने नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा येथेही राबविण्यात येत आहे. याशिवाय आरोग्य विभागाने आता स्वतंत्रपणे वर्धा, भंडारा, वाशिम, हिंगोली व जालना जिल्ह्य़ांत वृद्धांच्या आरोग्याची योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील लोक आता केवळ शेतीवर अवलंबून नाहीत, तर अनेक जण शहरांकडे उपजीविकेसाठी वळतात. अशा वेळी घरातील वृद्धांकडे पाहायलाही कोणाला वेळ मिळत नाही. यातूनच एकाकीपण व नैराश्याने वृद्धांना वेढले आहे. अशा वृद्धांना मानसिक उपचार, आरोग्यविषयक काळजी घेण्यास प्राधान्य दिले असल्याचे डॉ. साधना तायडे यांनी सांगितले.