|| संदीप आचार्य

आरोग्य सेवेची गती वाढवण्याबरोबरच प्रशासकीय कारभार प्रभावी करण्यासाठी राज्यात दोन आरोग्य संचालक असावेत, असा निर्णय आठ महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दुसरे संचालक नेमण्याचा आग्रह धरला होता. मात्र आठ महिने उलटल्यानंतरही आरोग्य मंत्रालयाकडून दुसऱ्या संचालकांची नियुक्ती करण्यात टाळाटाळ केली जात असल्याचे आरोग्य विभागातीलच डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्याच्या आरोग्याचा कारभार सेंट जॉर्ज रुग्णालयातील ज्या आरोग्य संचालनालयातून चालवला जातो तेथे सहसंचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक तसेच साहाय्यक संचालकांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एकेका अधिकाऱ्याला अनेक आरोग्य उपक्रमांच्या कामांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यातच दुसऱ्या आरोग्य संचालकांची नियुक्ती करण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आक्षेप येथील ज्येष्ठ डॉक्टरांकडून घेतला जात आहे.

विद्यमान आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे हे राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून निवड पद्धतीने नियुक्त करण्यात आले असून दुसरे संचालक हे पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे. याबाबत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आजपर्यंत निर्णय का घेतला नाही, असा सवालही डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

यापूर्वी हंगामी संचालक म्हणून काम केलेल्या सहसंचालिका डॉ. अर्चना पाटील यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्तीस टाळाटाळ केली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आरोग्य सेवेचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात विस्तार झाला असून संसर्गजन्य आजारांबरोबर असंसर्गजन्य आजारांना आळा घालण्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्राधान्य दिले आहे. मधुमेह व उच्च रक्तदाबासारखे असंसर्गजन्य आजार तसेच राष्ट्रीय आरोग्य उपक्रमादी राबविण्यासाठी तसेच प्रशासकीय निर्णयाला गती देण्यासाठी दोन आरोग्य संचालक असावेत अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यानुसार ९ जानेवारी २०१७ रोजी दोन संचालकांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. या नवीन संचालकांच्या पदाची कार्यकक्षा तसेच कर्तव्य व जबाबदारी निश्चित करण्याची जबाबदारी ही आरोग्य मंत्रालयाची होती. त्यांनी याबाबतचे आदेश जारी करणे अपेक्षित असताना आजपर्यंत याबाबत निर्णय झालेला नाही.

दुसऱ्या संचालकांच्या नियुक्तीची फाइल मंजुरीसाठी पाठवली आहे. लवकरच मंजुरी मिळण्याची आशा आहे.    – दीपक सावंत, आरोग्यमंत्री