News Flash

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांकडून रस्त्यावरील गरीब रुग्णांना ‘आरोग्य कवच’!

रस्त्यावरच्या गरीब रुग्णाला खरे तर शासकीय रुग्णालयातील उपचारही महाग असतात.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

रस्त्यावरच्या गरीब रुग्णाला खरे तर शासकीय रुग्णालयातील उपचारही महाग असतात. अशा रुग्णांना पंचतारांकितरुग्णालयात मोफत उपचार मिळणे हे स्वप्न पाहणेही शक्य नसते. मात्र रविवारी (३ डिसेंबर) राज्यातील ३५० हून अधिक धर्मादाय रुग्णालयांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला आहे. याचा फायदा रस्त्यावरील हजारो गरीब रुग्णांना तसेच गरीब वस्त्यांमधील रुग्णांना होणार असून रुग्णांना आरोग्य कवच देणारा हा अनोखा ‘आरोग्य यज्ञ’ ठरणार आहे.

महाराष्ट्रात जवळपास ४३० धर्मादाय रुग्णालये असून त्यापैकी मुंबईतील ७६ धर्मादाय रुग्णालयांनी रस्त्यावरील गोरगरिबांसाठी चार नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंतीचे निमित्त साधून ‘आरोग्य यज्ञ’ केला होता. या यज्ञामध्ये जवळपास ११ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. तर सुमारे ११५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते. खरे तर धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी दहा टक्के खाटा या गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी राखून ठेवणे न्यायालयानेच बंधनकारक केले आहे. तथापि अनेक रुग्णालये यालाही बगल देत गरीब रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करतात अशा तक्रारी वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडून विधिमंडळात करण्यात येतात. या पाश्र्वभूमीवर मुंबईचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना एका छत्राखाली आणून त्यांच्या माध्यमातून रस्त्यावरील गरीब रुग्णांना उपचार मिळवून देण्याचे ‘आरोग्याचे शिवधनुष्य’ उचलले आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी शिवकुमार डिगे यांच्या या मोहिमेला साथ दिली. त्यानंतर राज्यातील ३५० धर्मादाय रुग्णालयांनी आपल्या भागातील रस्त्यावरील तसेच गरीब वस्तीमधील रुग्णांकडे जाऊन उपचार करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. या संकल्पनेला धर्मादाय रुग्णालयांच्या संघटनांनी प्रतिसाद देत उद्या रविवारी राज्यभर ‘गरिबांना आरोग्याचा हक्क’ मान्य करून आपापल्या विभागात रस्त्यावरील रुग्णांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

धर्मादाय आयुक्त डिगे यांच्या समवेत साहाय्यक धर्मादाय आयुक्त (आरोग्य) आर. पेरे व अधीक्षक रुग्णालय मीरा कानकोनकर यांनी ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. याबाबत शिवकुमार डिगे म्हणाले, धर्मादाय रुग्णालयेच जर गरिबांच्या दारी गेली तर समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने एक चांगला संदेश जाईल. आपल्यालाही चांगल्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळू शकतो हा विश्वास गरीब रुग्णांमध्ये निर्माण होईल. या योजनेअंतर्गत ज्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये पन्नास खाटा आहेत त्यांनी दोन रुग्ण वाहिका, पन्नास ते शंभर खाटा असलेल्या रुग्णालयांनी तीन रुग्णवाहिका व शंभरपुढील खाटा असलेल्या रुग्णालयांनी चार रुग्णवाहिका व आवश्यक ते डॉक्टर घेऊन गरीब वस्त्या तसेच रस्त्यावरील गरिबांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे मान्य केले आहे. प्रत्येक रुग्णवाहिकेबरोबर दोन डॉक्टर, परिचारिका व आवश्यक कर्मचारी वर्ग असणार आहे. ही योजना राबविण्यासाठी धर्मादाय रुग्णालयांच्या संघटना तसेच डॉक्टरांबरोबर चार बैठका झाल्या असून प्रत्येक रुग्णालयाने कोणत्या भागात कशा प्रकारे काम करायचे हेही निश्चित झाले आहे. धर्मादाय रुग्णालये रस्त्यावरील गोरगरीब रुग्णांसाठी रस्त्यावर उतरण्यास तयार झाल्यामुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील ताणही हलका होणार असून धर्मादाय आयुक्तांच्या या संकल्पनेला रुग्णालयांनी साथ दिल्यामुळे रस्त्यावरील गरिबांनाही आता दर्जेदार उपचाराचे ‘आरोग्य कवच’ मिळणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 12:46 am

Web Title: health insurance for poor people
Next Stories
1 जीवनशैलीला भाडय़ाच्या वस्तूंचा साज
2 केरळमधील ९०० मच्छिमार सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचले : फडणवीस
3 दीड वाजताचे विमान साडेआठला उडाले, एअर इंडियाच्या २५० प्रवाशांचा विमानतळावर खोळंबा
Just Now!
X