मुंबई महापालिका रुग्णालयांमध्ये बालवाडी, पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना सेवा

अंगणवाडी, बालवाडी आणि मुंबई महापालिका शाळांमधील १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना पालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिला जाणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुलांना ही मोफत वैद्यकीय उपचार सेवा दिली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून १२.७९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे पैशाअभावी मुलाच्या वैद्यकीय उपचारांची चिंता करणाऱ्या गरीब कुटुंबातील पालकांची काळजीच मिटणार आहे.

महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालये, इतर सर्व रुग्णालये तसेच दवाखाने आदी ठिकाणी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी, बालवाडी व पालिकेच्या शाळेतील ० ते १८ वयोगटातील मुलांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही योजना महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राबवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सध्या स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.

आजारी किंवा कुठलाही वैद्यकीय दोष आढळलेल्या १८ वर्षांपर्यंतच्या मुलांची अंदाजित संख्या मुंबईत ३,८५,९७६ इतकी आहे. या रुग्ण बालकांच्या केस पेपरकरिता प्रत्येकी दहा रुपये, त्यापुढील पाठपुराव्याच्या केस पेपरचे शुल्क आणि रुग्णांवर उपचारादरम्यान केल्या जाणाऱ्या चाचण्या, शस्त्रक्रियेसह उपचारावर केला जाणारा खर्च असे सर्व गृहीत धरून १२ कोटी ७९ लाख ६४ हजार ४३० रुपये खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

ही योजना लागू झाल्यास महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या आजारी मुलांवरील मोफत उपचारांचा मार्ग मोकळा होईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे आपल्या आजारी मुलांकरिता पालकांना खिशात पैसे नाहीत म्हणून कुठेही हात पसरण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे ही योजना गरीब कुटुंबातील पालकांसाठी मोठे वरदान ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

शस्त्रक्रियेचा भारही उचलणार

सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभेत हा प्रस्ताव मंजूर झाला असून  पुढील मंजुरीसाठी तो स्थायी समितीपुढे सादर केला आहे. किरकोळ आजारांसह जे गंभीर आजार आहेत आणि त्याकरिता शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, त्याचाही भार या योजनेतून उचलला जाईल, असे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पदमजा केसकर यांनी स्पष्ट केले.