News Flash

Mucormycosis : “महाराष्ट्रासाठी पुढचे १० दिवस महत्त्वाचे”, आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता!

महाराष्ट्राला म्युकरमायकोसिसवरच्या उपचारांसाठी लागणाऱ्या एकूण २ लाख इंजेक्शनची आज गरज आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

करोनापाठोपाठ महाराष्ट्राला Mucormycosis अर्थात काळी बुरशी या आजाराचा देखील फटका बसला असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. “राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आत्ता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत असून हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत”, अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच, यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला या इंजेक्शनच्या वाटपामध्ये झुकतं माप द्यायला हवं, अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.

“पुढचे १० दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये औषधांचा, इंजेक्शनचा कसा पुरवठा होईल, ते महत्त्वाचं ठरणार आहे. मी स्वत: केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी बोललो आहे. याचा कच्चा माल साराभाई कंपनीकडून घेऊन आपण वर्धा आणि पालघरमधल्या उत्पादकांना देऊन हे इंजेक्शन बनवून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी २ किलो कच्चा माल पुरवण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. एका किलोमध्ये २० हजार इंजेक्शन तयार होतात. त्या माध्यमातूनही इंजेक्शन मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले. म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून उचलल्या जाणाऱ्या पावलांविषयी ते प्रसारमाध्यमांना माहिती देत होते.

करोनामुक्तांसाठी ‘म्युकरमायकोसिस’ प्राणसंकट

कोणतंही रेशनकार्ड असणाऱ्यांना मोफत उपचार

दरम्यान, यावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत कोणतंही रेशनकार्ड असणाऱ्या व्यक्तींना म्युकरमायकोसिसवरचे मोफत उपचार मिळतील, असं देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. “महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये ज्यांच्याकडे कुठलंही रेशनकार्ड आहे, त्यांना या आजारावरचा उपचार मोफत मिळणार आहे. इएनटी, डेंटिस्ट, ऑप्थोमोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन असे लागतात. या सर्जरी या आजारासाठी कराव्या लागतात. या योजनेतून प्रत्येकाच्या कुटुंबाला दीड लाख रुपयांचा कव्हर मिळतो. पण राज्य सरकारने जाणीवपूर्वक जो काही खर्च उपचाराला येईल, त्याची व्यवस्था केली आहे”, असं ते म्हणाले.

म्युकरमायकोसिस! राजस्थानमध्ये ‘ब्लॅग फंगस’ आता साथीचा आजार

एका रुग्णाला १०० इंजेक्शन रोज लागतात!

म्युकरमायकोसिसवर आवश्यक असणाऱ्या उपचारांची आणि त्यांच्या उपलब्धतेविषयी देखील राजेश टोपे यांनी यावेळी माहिती दिली. “म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी दररोज १०० लागतात. पुढे दर आठवड्याला ५०० च्या आसपास रुग्ण वाढणार आहेत. या क्षणाला आपल्याला दीड ते दोन लाख इंजेक्शन हवे आहेत. त्यासाठी १ लाख ९० हजार इंजेक्शन्सची ऑर्डर देखील आपण दिली आहेत. तिचे पैसे देखील आपणच देणार आहोत. पण त्याचं वाटप कसं करायचं, हे केंद्राच्या हातात आहे. जशी रेमडेसिविरला एक स्थिरता आली आहे, तशी या बाबतीत ३१ मेनंतर इंजेक्शनची उपलब्धता होईल. त्यामुळे पुढचे १० दिवस अडचणीचे आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने प्रयत्न करून हे इंजेक्शन पुरवावेत”, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 6:40 pm

Web Title: health minister rajesh tope warns on mucormycosis patients in maharashtra pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 बालगोपाळांसाठी ‘मधली सुट्टी’चा ज्ञानखजिना – पहा YouTube वर Live
2 “गडकरींनी सांगूनही राजकारण करण्याची हौस फिटत नाही”; रोहित पवारांची भाजपावर टीका
3 ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर, म्हणाले…
Just Now!
X