टाटा मेमोरिअल रुग्णालयामध्ये कार्यशाळा

गावागावांत रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यसेविका कर्करोगाचे निदान पहिल्याच टप्प्याकरण्याइतपत सक्षम होणार आहेत. टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या पुढाकारातून सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या आरोग्यसेविकांना कर्करोग प्रतिबंध, निदान आणि उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा घेण्यात येत आहे. दोन आठवडय़ाच्या या कार्यशाळेमध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्य़ातील आरोग्यसेविका सहभागी झालेल्या आहेत.

कर्करोग हा दुर्धर आजार असून भारतामध्ये स्तनाचा, गर्भाशय मुखाचा आणि हिरडय़ाच्या कर्करोगाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. या वाढत्या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि लक्षणे यासंबंधी जनजागृती होणे आवश्यक आहे. कर्करोगाच्या आजाराचे निदान वेळेत होत नसल्यामुळे या आजाराची गंभीरता वाढत आहे. तेव्हा गावागावांमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांमार्फत कर्करोगाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने टाटा मेमोरिअल आणि आरोग्य विभाग यांच्या वतीने १२ ते २४ मार्च या काळामध्ये आरोग्यसेविकांसाठी कार्यशाळा आयोजित केली.

दोन आठवडय़ांच्या या कार्यशाळेमध्ये आरोग्यसेविका त्यांच्या गावागावांमध्ये कर्करोग जनजागृतीचे कार्यक्रम घेण्याइतपत सक्षम होणार आहेत. तसेच कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि रुग्णांना योग्य ठिकाणी उपचार पद्धती घेण्यासाठी मार्गदर्शनदेखील करू शकणार आहेत, असे टाटा मेमोरिएल रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक विभागाच्या प्राध्यापक डॉ. शर्मिला पिंगळे यांनी सांगितले. आयआयटी मुंबईच्या मदतीने तयार केलेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून आजाराबाबतची माहिती या सेविकांना सांगितली जाणार आहे. हे व्हिडीओ असलेले टॅब ही  दिले गेले असून तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्यसेविकांना कमीत कमी वेळेमध्ये आरोग्यसेविकांना संपूर्ण माहिती दिली जाणार असल्याचे प्राध्यापक डॉ. गौरवी मिश्रा यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेमध्ये सेविकांना स्तनाचा, गर्भाशय मुखाचा आणि हिरडय़ाचा कर्करोग कसा ओळखावा, हे आजार झाल्यास उपचारासाठी कुठे जावे इथपासून ते हे आजार होऊ नयेत म्हणून जीवनशैलीमध्ये कोणते बदल करणे गरजेचे आहे, याबाबतची प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये दिले जाणार आहे.

-डॉ. बडवे, संचालिका , टाटा मेमोरिअल रुग्णालय