मुंबई : गेल्यावर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत महानगर पालिकेने सुरू केलेल्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या आरोग्य यंत्रणेवर आतापर्यंत ११८ कोटी ६५ लाख रुपये खर्च झाले आहेत. न्यायालयीन वादामुळे बंद पडलेले हे रुग्णालय पालिके ने सुरू केल्यानंतर डिसेंबर अखेर पर्यंत या रुग्णालयात १६ हजार ५३० रुग्णांवर उपचार करण्यात आले.

गेल्यावर्षी मुंबईत करोनाचा कहर सुरू झाला तेव्हा परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या विलगीकरणासाठी या रुग्णालयाचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर येथे नियमीतपणे उपचार करण्यास सुरवात झाली. या इमारतीतील तब्बल ३५० ट्रक राडारोडा आणि भंगार सामान अवघ्या ४८ तासात साफ करण्यात आले होते. अवघ्या दोन दिवसांत या रुग्णालयाची स्वच्छता करण्यात आली.  सर्व आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध केली.  रुग्णालयायातील वैद्यकिय कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.  यासाठी महानगर पालिकेने डिसेंबरपर्यंत ११८ कोटी ६५ लाखांचा खर्च केला, अशी माहिती प्रशासनाने कार्योत्तर मंजूरीसाठी स्थायी समितीच्या पटलावर मांडली. रुग्णालयाच्या नियमीत व्यवस्थापनासाठी डिसेंबर अखेर पर्यंत ६५ कोटी ४३ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर, डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २३ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

पालिकेने २००४ ला सेव्हन हिल्स संस्थेसोबत सामंजस्य करार करून कर्करुग्णांसाठी ६६,६८७.९० चौ. मीटर क्षेत्रफळ जागेवर १३०० खाटांचे   रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला होता.   कराराची अंमलबजावणी न केल्याने रुग्णालय डबघाईला आले होते.