भारतरत्न भीमसेन जोशी यांची सुमारे १० कोटी रुपयांची मालमत्ता आणि जवळपास २० संगीत कंपन्यांच्या रॉयल्टीवरून त्यांच्या पहिल्या व दुसऱ्या पत्नींच्या मुलांमध्ये सुरू असलेल्या वादावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दोन आठवडय़ांसाठी स्थगित केली. जोशी यांनी आपल्या हयातीत जी मालमत्ता हस्तांतरीत केली मात्र मृत्युपत्रात काही गोष्टींचा उल्लेख केलेला नाही अशा गोष्टींना मृत्युपत्राला आव्हान देण्याच्या निमित्ताने आव्हान दिले जाऊ शकत नाही, असा दावा करीत जयंत जोशी यांनी यासंदर्भात केलेल्या याचिकेत दुरुस्ती करण्यासाठी सोमवारी न्यायालयाकडे वेळ मागितला. राघवेंद्र जोशी यांच्याकडूनही त्याला हरकत घेण्यात न आल्याने न्यायालयाने जयंत यांचे वकील अ‍ॅड्. राजेंद्र पै यांची मागणी मान्य करीत सुनावणी २५ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.